पिंपरी : चिखली येथील एटीएम फोडून साडेअकरा लाख रुपये लुटणाऱ्या तिघांना पोलिसांच्या विशेष पथकाला (एसआयटी) मोठे यश आले आहे. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. वकील ऊर्फ शकील मोहम्मद हारून, जाकर ऊर्फ जाकीर इद्रीस खान (वय 36), इनाम नसरू खान (वय 33, सर्व रा. हरियाना) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली येथील गुन्ह्यातील तपासात आरोपी वकील याच्याशी साम्य असल्याचे दिसून आले. त्याच्याबाबत अधिक माहिती घेतली असता त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांचे एक पथक दिल्ली येथे रवाना करून आरोपी वकील याला पोलिसांनी चिखली येथील गुन्ह्यात वर्ग करून घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने 10 नोव्हेंबर 2019 रोजी आपल्या साथीदारांच्या मदतीने चिखली येथील ऍक्सीस बॅंकेचे एटीएम गॅस कटरने कापून नेल्याची कबुली दिली.
त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचे साथदार इनाम खान आणि जाकीर खान या दोघांना हरियानातून अटक केली. आरोपी वकील हा सराईत गुन्हेगार असून हरियाना पोलिसांनी त्याच्यावर 50 हजारांचे बक्षिस ठेवले आहे. आरोपी वकील याला 13 जानेवारीपर्यंत तर त्याचे दोन साथीदार इनाम खान व जाकीर खान यांना 17 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
यापूर्वी आळेफाटा पोलिसांनी एटीएम फोडणाऱ्या टोळीला अटक केली होती. त्या टोळीला एसआयटीच्या पथकाने गुन्ह्यात वर्ग करून अधिक तपास केला असता त्यांनी नाशिक येथे दोन एटीएम तसेच एका मंदीरातील दानपेटी चोरल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. चाकण येथील एटीएम फोडल्यानंतर या गुन्ह्यांच्या तपासाकरिता पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी एसआयटी पथकाची 15 डिसेंबर 2018 रोजी स्थापना केली. महिनाभरात आम्ही एटीएमच्या गुन्ह्यांचा छडा लावू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. मात्र महिनाभराच्या आतच एसआयटी पथकाच्या कामाला यश आल्याचे दिसून आले आहे.
पोलीस आयुक्त संदीप बिष्णाई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक आयुक्त सतीश कांबळे, राम गोमारे, उपनिरीक्षक विजय जगदाळे, सहाय्यक उपनिरीक्षक सुभाष सावंत, कर्मचारी मंगेश गायकवाड, सचिन अस्वले, सोमनाथ बोऱ्हाडे, कबीर पिंजारी, विशाल भोईर, महादेव जावळे, नितीन खेसे, पंकज भदाणे, प्रवीण पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली.