शहरातील जैविक कचऱ्यात पीपीई किट, मास्क, ग्लोव्हजचा समावेश
पुणे – शहरात रोज निर्माण होणाऱ्या एकूण कचऱ्यात 400 टनाने घट झाली असली तरी दुसरीकडे रोज सुमारे साडेतीन टन “बायोमेडिकल वेस्ट’ गोळा केले जात आहे. जैविक कचऱ्यामध्ये पीपीई किट, मास्क, ग्लोव्हज आणि अन्य जैविक कचऱ्याचा समावेश आहे.
शहरात निर्माण होणारा कचरा, सार्वजनिक रस्त्यांवरील कचरा, हॉटेल आणि व्यावसायिक आस्थापनांच्या माध्यमातून निर्माण होणारा कचरा जवळपास 765 गाड्या आणि हजारो सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गोळा केला जातो. यामध्ये झाडांचा पाला पाचोळा, नारळाच्या झावळ्या, फांद्या असा गार्डन वेस्टचाही समावेश आहे.
मात्र, लॉकडाऊनमुळे विविध अस्थापना आणि वाहतूक बंद ठेवल्याने तसेच मुख्यत्त्वे हॉटेल्स बंद असल्याने कचऱ्याचे प्रमाण निम्म्याने घटले आहे; परंतु लॉकडाऊन शिथिल केल्याने कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. कचऱ्यात जैविक कचऱ्याची भर पडली आहे. पूर्वी या कचऱ्यात सलाइनच्या बाटल्या, इंजेक्शन्स आदी साहित्य टाकले जात होते. आता, या कचऱ्यापेक्षा “कोविड वेस्ट’चे प्रमाण अधिक वाढले आहे.
कोविड वेस्टसाठी डबल “यलो बॅग’…
“पास्को’ संस्थेच्या 14 गाड्यांमार्फत रुग्णालये आणि कलेक्शन पॉईंटवरून, करोना प्रादुर्भावापूर्वी साडेतीन ते चार मेट्रिक टन बायो मेडिकल वेस्ट जमा केले जात होते. आता यात रेड वेस्टचे प्रमाण कमी झाले असून, साधारणत: साडेतीन टन “कोविड वेस्ट’ वाढले आहे. शहरातील 600 कलेक्शन पॉईंटवरून खासगी क्लिनिकचे मेडिकल वेस्ट जमा केले जाते. डबल यलो बॅगमध्ये सदर कोविड वेस्ट सील करून द्यावे लागते.