380 मतदान केंद्रांवर 380 पोलीस, 1593 कर्मचारी नियुक्त
दिवे – पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 21) मतदान होत आहे. यानिमित्त पुरंदर प्रशासनाच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. पुरंदर-हवेलीमधून एकूण 3 लाख 61 हजार 480 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये 1 लाख 89 हजार 381 पुरुष मतदार तर 1 लाख 72 हजार 383 स्त्री मतदार आहेत. त्याच प्रमाणे 1946 पोस्टल मतदान होणार असून 1303 दिव्यांग मतदारांची नोंद झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आरती भोसले आणि सह निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली.
दिवे (ता. पुरंदर) येथील शासकीय धान्य गोडाऊन मधून सर्व मतपेट्या निवडणूक कर्मचाऱ्यांना वितरीत करण्यात आल्या. एकूण 380 मतदान केंद्रांवर 380 पोलीस कर्मचारी आणि 1593 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ईव्हीएम मशीन, शाई, दोरा, त्याच प्रमाणे इतर साहित्य कर्मचाऱ्यांना वितरीत करण्यात आले असून सर्व यंत्रणा नियोजित मतदान केंद्रावर पोहोच करण्यात आल्या आहेत.
सासवड येथील पुरंदर हायस्कूलसह दिवे, गराडे, भिवडी, परिंचे ही पाच मतदान केंद्रे संवेदनशील केंद्रे म्हणून घोषित करण्यात आली असून या केंद्रांवर अधिक चोख व्यावस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आंबेगाव, जेजुरी आणि नीरा ही मतदान केंद्रे आदर्श केंद्रे म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. मतदार संघात एकूण 380 मतदान केंद्रे असून दिव्यांग व्यक्तींना मतदानाचा हक्क वापरता यावा त्यांना मतदान करताना कोणताही त्रास होवू नये, यासाठी 180 व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गरजेनुसार आणखी उपलब्ध करून देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात सर्वाधिक पोस्टल मतदान पुरंदरमधून –
जिल्ह्यात सर्वाधिक पोस्टल मतदान पुरंदर-हवेली मतदारसंघात होणार आहे. या मतदारसंघात एकूण 1946 इतके पोस्टल मतदार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आरती भोसले आणि सहनिवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली.
वाघिरे महाविद्यालय सखी मतदानकेंद्र –
सासवड येथील वाघिरे महाविद्यायातील मतदान केंद्राची सखी मतदान केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे. या केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह निवडणूक कर्मचारी तसेच बंदोबस्तावरील सुरक्षा कर्मचारी या महिला पोलीस कर्मचारी राहणार आहेत. सर्व व्यवस्था महिला अधिकारी आणि कर्मचारी पाहणार आहेत.