पुणे – दसऱ्यासाठी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फूल बाजारात झेंडूसह विविध फुलांची सोमवारी मोठी आवक झाली. फूल बाजारात संपूर्ण राज्यातून झेंडू विक्रीसाठी पाठविण्यात आला असून 3 लाख 43 हजार 626 किलो एवढी आवक झाली. पावसामुळे झेंडूच्या प्रतवारीवर परिणाम झाला. किरकोळ बाजारात 1 किलो झेंडूची विक्री प्रतवारीनुसार 50 ते 70 रुपये किलो या दराने करण्यात आली.
झेंडूची सोमवारी दुप्पट, तिपटीने आवक झाली. पावसामुळे झेंडूच्या प्रतवारीवर परिणाम झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी झेंडूची तोड करून बाजारात विक्रीसाठी पाठविला. गतवर्षीच्या तुलनेत झेंडूला कमी दर मिळाले असून बाजारात 80 ते 100 रुपये किलो दराने विक्री झाली होती, अशी माहिती फूल बाजारातील व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
जुईला प्रतिकिलोला 1900 रुपयांचा भाव
घाऊक फूल बाजारात जुई 50 ते 60 किलो, तसेच चमेली 6 ते 7 किलो आवक झाली. आळंदी, सोरतापवाडी, उरळी कांचन भागातील शेतकऱ्यांनी 50 ते 60 किलो जुई बाजारात विक्रीसाठी पाठविली. चमेलीची आवक तळेगाव ढमढेरे भागातून झाली. प्रतिकिलो जुईला 1900 रुपये आणि चमेलीला 1 हजार रुपये, असा दर मिळाला.