नेवासा – येथील रघुजन गॅस एजन्सीमध्ये गॅस डिलिव्हरीचे काम करणाऱ्या रमेश चंद्रकांत उकिर्डे याला एक पर्स सापडली होती. त्यात तब्बल साडेतीन लाखांचा ऐवज होता. त्याने सापडलेली पर्स प्रामाणिकपणे परत केली आहे. त्याच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नेवासा बसस्थानकाजवळ रस्त्याच्या कडेला एक पर्स उकिर्डे यांना दिसली. त्यामध्ये दोन मोबाइल, सोन्याचे दागिने आणि काही रोकड अशा स्वरुपात एकुण साडेतीन लाखांचा ऐवज होता.
ती पर्स नेवासा येथील अंगणवाडी सेविका मन्नाबी रफिक बागवान यांची असल्याचे समजले असता उकिर्डे यांनी नेवासा येथील डॉ. बागवान यांच्याशी संपर्क साधून सापडलेला संपूर्ण ऐवज त्यांच्याकडे परत केला. डॉ बागनान यांनी ही वस्तुस्थिती मन्नाबी बागवान यांना सांगितली असता अंगणवाडी सेविकेने या कामगाराच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. पेढे भरवून या कामगाराचे कौतुक केले. रघुजन गॅस एजंन्सीमध्ये सिलेंडर पुरवठा करणाऱ्या प्रामाणिक कामगारावर संपूर्ण नेवासा तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.