चिंचवडमध्ये अवतरले साडेतीन शक्‍तीपीठ!

प्रतिकृती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी : विविध कार्यक्रमांच्या आयोजनामुळे रंगत

पिंपरी  – पिंपरी-चिंचवड शहरावर नवरात्रोत्सवाचा ज्वर चढला आहे. शहरात ठिकाठिकाणी रास-गरबा, दांडियाचे कार्यक्रम रंगत आहेत. चिंचवड नवरात्र महोत्सवाच्या वतीने सूर्यमुखी मंदिर व साडेतीन शक्‍तीपीठाची प्रतिकृती साकारली आहे. ती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

चिंचवड नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दक्षिण भारतातील सूर्यमुखी मंदिराची 43 फूट उंचीची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. यामध्ये देवीच्या फायबरच्या तीन भव्य मूर्ती भाविकांचे लक्ष वेधत आहेत.

आकर्षक विद्युत रोषणाईमुळे रात्रीच्यावेळी मंदिराची प्रतिकृती अधिकच आकर्षक दिसते. मूर्तीकार शितल व योगेश कुंभार यांच्या हस्ते देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. यावेळी मकरंद बेलसरे यांनी पौराहित्य केले. रविंद्र देव यांच्या स्वानंद धुपारती मंडळाच्या वतीने मोरया पदे व महाआरती पार पडली.

श्री मोरया पारायण मंडळाच्या वतीने श्री मोरया चरित्र पठणाचा कार्यक्रम झाला. वृंदावन भजनी मंडळ, दशोनेमा भजनी मंडळ, स्वरदा भक्तिगीत मंडळ, मोरया महिला भजनी मंडळ, ज्ञानदीप भजनी मंडळ, हरिपाठ प्रचार भजनी मंडळ, सिद्धकला भजनी मंडळ, गीताई भजनी मंडळ यांनी आपली भजन सेवा दुर्गामातेच्या चरणी अर्पण केली.

350 विद्यार्थिनींची पाद्य पूजा
कुमारिका पूजनाच्या कार्यक्रमात संस्कृती संवर्धन व विकास महासंघ, गायत्री परिवार तसेच चिंचवड परिसरातील भजनी मंडळानी सहभाग घेतला. दहा शाळांतील 350 विद्यार्थिनींची पाद्य पूजा करून त्यांना भेटवस्तू, प्रसाद देऊन सांगता करण्यात आली. मुली व महिलांनी हळदी – कुंकू का लावावे, त्याचे महत्त्व डॉ. अजित जगताप यांनी विषद केले. या शिबिरात नेत्र परीक्षण, चष्मा व औषध वाटप करण्यात आले. चिंचवड नवरात्र महोत्सवाच्या अध्यक्षा अश्‍विनी चिंचवडे, शोभा जोशी, माधुरी कवी, सुभाष चव्हाण, यशवंत देशपांडे, अनिता कोळसुने, पुष्पा पाटील आदींनी संयोजन केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)