सुपा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नगर: नगर-पुणे महामार्गावर सुपा परिसरात लुटमार करणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यांना मुद्देमालासह सुपा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
या प्रकरणी 2 मार्च रोजी संदीप किसन कजबे (वय-37, रा. अपधूप, ता. पारनेर) हे त्यांच्या साथीदारांसह दुचाकीवरून नगर-पुणे रोडने सुपा एमआयडीसीकडे जात असताना रात्री दहाच्या सुमारास वाघुंडे खुर्द शिवारात पाठीमागून आलेल्या अनोळखी तीन इसमांनी दमदाटी करुन दोन मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 16 हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला होता. या घटनेबाबत कजबे यांनी सुपा पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरोधात फिर्याद दिली होती.
या आरोपींची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारांकडून मिळाली. हा गुन्हा गौरव घायाळ (रा. सुपा) याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याचे समजले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे विजयकुमार वेठेकर, रवींद्र कर्डिले, सचिन अडबल, संदीप पवार, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, चालक बाळासाहेब भोपळे यांनी सुपा परिसरात आरोपीचा शोध घेवून गौरव हरिभाऊ घायाळ (वय-20, रा. एकता चौक, सुपा, ता.पारनेर) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्यातील इतर साथीदारांबाबत विचारपूस करून गणेश सुभाष शिंदे, (वय-19, रा. रांजणगांव मशिद, ता. पारनेर), चेतन सुभाष धाडगे, (वय-19, रा. धाडगेवाडी, रांजणगाव मशिद, ता. पारनेर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण 15 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.