नवी दिल्ली,वृत्तसंस्था : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर केवळ भातातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. भाजप नेत्यांच्या वक्तव्यानंतर आखाती देशात खळबळ माजली असून विशेषतः इस्लामिक देशामधून भारताला विरोध होताना दिसत आहे. अशातच आता आरएसएस चे कार्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली असून याबाबत लखनौ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, व्हाट्सअँप द्वारे लखनौ आणि उन्नाव येथील RSS चे कार्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी लखनौ येथील माडियाव पोलिस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली असून युनियन कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने याबाबत तक्रार केली आहे. ही धमकी सकाळी ८ वाजता व्हाट्स ऍप च्या माध्यमातून देण्यात आली असल्याची माहिती आहे. व्हाट्स अँप वर एक लिंक देण्यात आली होती. या लिंकद्वारे RSS चे कार्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीप्रकरणी सध्या पोलिसांनी तपास सुरु केला आहे .
ओआयसी कडून तिखट प्रतिक्रिया
दरम्यान प्रेषित मोहम्मद यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून ५७ सदस्यदेश असलेल्या ओआयसीने तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. भारतातील अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण व्हावे यासाठी संयुक्त राष्ट्रांनी लक्ष ठेवावे, असे ओआयसीने म्हटले आहे. एवढेच नाही तर आखाती देशांकडून सोशल मीडियावर भारतीय उत्पादनांवर बंदी घालण्याचे आवाहन केले जात आहे.
नुपूर शर्मा यांचे निलंबन
दरम्यान वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी नुपूर शर्मा यांचे निलंबन करण्यात आले आहे. भाजपच्या शिस्तपालन समितीने म्हटले की, शर्मा यांच्या वक्तव्याबाबत चौकशी होणार आहे. शर्मा यांनी एका धर्माबद्दल वादग्रस्त विधान करून भाजपच्या ध्येय धोरणांचा भंग केला आहे . हा वाद जगभर पोहोचला असून आखाती देशांनीही या वादावर भारताचा निषेध केला आहे. तसेच, भारतीय राजदूतांना बोलावून घेतले आहे.