मुंबईमध्ये बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ माजली होती. सिद्दीकी यांच्या हत्येवर अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी संताप व्यक्त करत कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईविरोधात वक्तव्य केलं होत. यानंतर यादव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
अशातच पूर्णिया पोलिसांनी केलेल्या जलदगती तपासामुळे या प्रकरणातील महत्वपूर्ण धागेदोरे हाती लागले आहेत. यादव यांना धमकी दिल्या प्रकरणात दिल्लीहून महेश पांडेय या युवकाला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांनी पत्रकार परिषदेत या अटकेची माहिती दिली असून या प्रकरणातील अनेक रहस्यं उलगडण्याची शक्यता आहे.
लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने देण्यात आलेल्या या धमकीच्या तपासादरम्यान पोलिसांनी अनेक फोन नंबर्सचं विश्लेषण केलं. त्यात एक दुबईचा नंबर विशेष लक्षवेधी ठरला. यानंतरच तपासाची चक्र वेगाने फिरवून पोलिसांनी महेश पांडेय या युवकावर लक्ष केंद्रित केलं. दिल्लीमध्ये शोधमोहीम राबवून त्याला अटक करण्यात आली.
आश्चर्याची बाब म्हणजे, महेशचा लॉरेन्स बिश्नोईशी काहीही संबंध नसल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे. मग त्याने पप्पू यादव यांना धमकी का दिली? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
महेश पांडेयची मेहुणी दुबईत राहते, आणि धमकीसाठी वापरलेला फोन नंबरही दुबईचा होता. यामुळे या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा संशय वाढतोय.
पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांनी सांगितलं की, महेशचे काही मोठ्या व्यक्तींशी थेट संबंध आहेत. त्याने पूर्वी एम्स आणि काही मंत्रालयांच्या कॅन्टीनमध्ये काम केलं आहे. सध्या तो कुठेही काम करत नव्हता, ज्यामुळे त्याच्या हालचालींवर अधिकच संशय निर्माण झाला.
महेश पांडेयला अटक झाल्याने महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. मुंबईत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पप्पू यादव यांना धमक्या मिळाल्या होत्या, ज्यात लॉरेन्स बिश्नोईचं नाव आलं होतं. या सर्व घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, हे शोधणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पोलिसांचा पुढील तपास आता, या धमकीमागे खरोखर कोण आहे आणि त्याचे हेतू काय आहेत, या दिशेने असेल.