तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा
नगर – फुकट बिअरच्या बाटल्या दे नाहीतर दुकान फोडून टाकीन अशी धमकी देत बिअर बाटल्यांची खंडणी मागिल्याचा प्रकार सावेडीत घडला. खंडणीस नकार दिल्यानंतर वाइन शॉपवर दगडफेक करण्यात आली.झोपडी कॅन्टीन परिसरातील डिलक्स वाइन शॉपवर रविवारी (दि.2) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोन्या नेटके व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाइन शॉपचे मॅनेजर सुनील गुरूमुखदास बजाज (रा. तारकपूर) यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी सायंकाळी सोन्या नेटके हा त्याच्या दोन साथीदारांसह वाइन शॉपवर आला. त्याने तीन बिअरच्या बाटल्या मॅनेजर बजाज यांच्याकडे मागितल्या. मागील उधारी अन् आताच्या तीन बिअर बाटल्याचे पैसे दे’ असे बजाज यांनी त्यास सुनावले.
याचा राग नेटके व त्याच्या साथीदारांना आला. त्या रागातून नेटके व त्याच्या साथीदारांनी वाइन शॉपवर दगडफेक करत बजाज यांच्या दिशेनेही दगडफेक केली. नेटके व त्याच्या साथीदारांनी फुकटात बिअरच्या बाटल्या दे नाहीतर दारूचे दुकान फोडून टाकू अशी धमकी दिल्याचे बजाज यांनी फिर्यादीत म्हटले आहे.