बगदाद – अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धमकी देणारा व्हिडीओ पोस्ट केल्याच्या कारणावरून इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे टिविटर अकाऊंट ट्विटरने कायमस्वरुपी बंद केले आहे. ट्विटरच्या धोरणाचा भंग केल्याबद्दल हे अकाऊंट कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहे, असे ट्विटरच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली.
खामेनीसाऊट या नावाच्या ट्विटर अकाऊंटवर गेल्या आठवड्यात एक ऍनिमेटेड व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. त्यामध्ये चालक नसलेले एक विमान ट्रम्प यांना लक्ष्य करत असल्याचे दर्शवण्यात आले होते. ट्रम्प यांनी दोन वर्षांपूर्वी बगदादवर ड्रोन हल्ल्यांचे आदेश दिले होते. त्या ड्रोन हल्ल्यामध्ये इराणचे वरिष्ठ कमांडर जनरल कासिम सुलेमानी ठार झाला होता. त्या घटनेच्या अनुषंगानेच या ट्विट संदेशात ट्रम्प यांना लक्ष्य केले गेले होते.
आयतोल्ला खामेनी यांची अन्य भाषांमधील ट्विटर अकाऊंट सुरूच ठावण्यात आली आहेत. ट्रम्प यांचा सूड घेण्याचा संदश पसरवल्याबद्दल खामेनी यांचे असेच एक अकाऊंट ट्विटरने बंद केले आहे.