लखनौ – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार मारण्याची पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. लखनौच्या आलमबाग येथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात सापडलेल्या बॅगमध्ये ही धमकीची चिठ्ठी मिळाली आहे. त्यात मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
ज्याच्या घरात ही बॅग आणि चिठ्ठी सापडली त्या व्यक्तीचे नाव देवेंद्र तिवारी आहे. ते मुळचे लखनौ येथील राहणारे असून सध्या त्यांचे वास्तव्य अयोध्या येथे आहे. संपूर्ण देशात अवैधपणे चालवल्या जाणाऱ्या कत्तलखान्यांच्या विरोधात तिवारी आंदोलन करत असतात. याशिवाय या कत्तलखान्यांच्या विरोधात त्यांनी काही जनहित याचिकाही दाखल केल्या आहेत.
दरम्यान, या चिठ्ठीत योगींसह तिवारींनाही बॉम्बने उडवण्याची धमकी दिली गेली आहे. यापूर्वी 2 ऑगस्ट रोजीही व्हॉटसअप योगी यांना मारण्याची धमकी देण्यात आली होती. एका युवकाने ही धमकी दिली होती व त्याच्या अटकेसाठी उत्तर प्रदेश पोलिसांच्या दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत.