माझ्याही जीवाला धोका : साध्वी प्राची

हरीद्वार : माझ्या जीवालाही धोका आहे, अशी भावना आक्रमक हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्राची यांनी कमलेश तिवारी यांच्या हत्येनंतर व्यक्त केली. तिवारी यांची हत्या मुस्लिम दहशतवाद्यांनीच केल्याचा आरोप त्यांनी केला.

येथे पत्रकारांशी बोलताना साध्वी म्हणाल्या, केंद्रीय गृहमंत्री, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकार यांच्याकडे मी संरक्षण मागितले आहे. मला इसिसकडून अनेकदा धमक्‍या आल्या आहेत. मात्र इश्‍वरावर माझा पूर्ण विश्‍वास असल्याने मी या गोष्टीची वाच्यता केली नव्हती. मात्र, कमलेश तिवारी यांच्या हत्येने मी अस्वस्थ झाले आहे. काही दिवसांपुर्वी काही जण माझ्या आश्रमात येऊन माझी चौकशी करून गेले आहेत. त्यामुळे मला सुरक्षेची गरज आहे, असे मला वाटते.

मुस्लिम दहशतवाद्यांना भारतात कोण आश्रय देते याची सखोल चौकशी व्हायला हवी. कमलेश तिवारी यांची सुरक्षा व्यवस्था का काढून घेतली? याची चौकशी योगी सरकारने करावी आणि यात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.