पठार भागातील हजारो महिलांचे रोजगारासाठी स्थलांतर

दुष्काळामुळे अवघ्या दीडशे रुपये रोजंदारीवर काम करण्याची वेळ 

संगमनेर – संगमनेर तालुक्‍यातील प्रवरा आणि मुळा नदीकाठचा परिसर सोडल्यास उर्वरित भागाला यंदा अत्यल्प पावसामुळे दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पठार भागाला तर, दुष्काळ हा पाचवीला पुजलेला असतो. सध्या याठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या पाण्याची सोय होणेदेखील कठीण झाले आहे. यंदा उद्‌भवलेल्या दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी पठार भागातल्या गावांतील हजारो महिला दररोज शेतावर मोलमजुरी करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्‍याला जात आहे.

पठार भागातील बोटा, कुरकुटवाडी, भोजदरी, सारोळे पठार, केळेवाडी, अकलापूर, आंबी-दुमाला, नांदूर खंदारमाळ, डोळासणे, हिवरगाव पठार, पिंपळगाव डेपा, गुंजाळवाडी, वरुडी पठार, दरेवाडी यागावच्या आसपास राहणाऱ्या आदिवासी वाड्या वस्त्यांतील महिला दररोज सकाळी रोजंदारीसाठी घरातून बाहेर पडत आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्‍यातील नारायणगाव, ओतूर, आळेफाटा, बेल्हे येथील बागायती शेतांवर मोल मजुरीसाठी या महिला जातात.

यासाठी पठारभागातल्या प्रत्येक गावातून आणि वाडीतून दररोज सकाळी नऊ वाजता महिला कामगारांची ने-आण करण्यासाठी गाडीची व्यवस्था केलेली असते. प्रत्येक गाडीत साधारण तीस ते चाळीस महिला कामगार घेऊन गाडी ठरलेल्या ठिकाणी त्यांना सोडते आणि सायंकाळी पुन्हा त्याच ठिकाणाहून त्यांना परत आणण्याची व्यवस्था केली जाते. महिलांकडून काम करून घेणाऱ्या बागायतदाराकडून या महिलांना प्रत्येकी दीडशे रुपये रोजंदारी दिली जाते. त्यांची ने-आण करण्याऱ्या वाहन चालकास पन्नास रुपये प्रति महिला असे गाडी भाडे देण्यात येते.

यंदाचा दुष्काळ अत्यंत भयंकर आहे, पिण्याचे पाणीसुद्धा उपलब्ध नसल्यामुळे दावणीला असलेली सर्व जनावरे आम्ही विकून टाकली आहे. याठिकाणी उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे शेजारच्या तालुक्‍यात मोल मजुरी करून दिवस काढण्याचे काम करत आहोत.

– आशाबाई काळे, महिला ग्रामस्थ, हिवरगाव पठार, ता. संगमनेर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.