मॉस्को – रशियाने युक्रेनच्या जिंकलेल्या भागाला रशियात सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याची घोषणाही करण्यात आली आहे. रशियाचे राखीव लष्करही आता उपयोगात आणले जाणार आहे. त्याची संख्या 3 लाख आहे. या तीन लाख जणांना मुख्य लष्करात समाविष्ट करून घेण्याबाबतच्या हुकुमनाम्यावर अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी स्वाक्षरी केल्याची बातमी आहे. त्याकरता जमवाजमव सुरू झाली आहे. एकीकडे हा सगळा घटनाक्रम होत असताना खुद्द रशियामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
आमचे सरकार म्हणजे रशियाचे सरकार जे काही सांगते आहे ते सगळे खोटे आहे. आमचा सरकारवर विश्वास नाही असे म्हणत हजारो रशियन नागरिक रशियाच्या बाहेर पलायन करत आहेत. सध्या तरी शेजारच्या जॉर्जियाकडे या नागरिकांचे पलायन सुरू असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.
रशियन लोक पायी चालत, सायकलवर किंवा मिळेल त्या वाहनाने बाहेर पडत असल्याचा दावा छायाचित्रांसह करण्यात आला आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. मात्र माझ्या भल्यासाठी मला हा देश सोडावा लागतो आहे अशा काही जणांच्या प्रतिक्रियाही देण्यात आल्या आहेत. आमचा सरकारवर विश्वासच नाही. सरकारकडून जमवाजमव होणार नाही.
आम्ही अगोदरच ते ऐकले आहे. सगळेच खोटे आहे व आम्हाला त्याचा अनुभवही घ्यायची इच्छा नाही अशी प्रतिक्रिया एका नागरिकाने सीएनएनशी बोलताना दिली. राखीव सैन्याची जमवाजमव करण्याचे सूतोवाच पुतीन यांनी केल्याची भीतीही या नागरिकांमध्ये दिसून येते आहे. त्यांना लष्करात दाखल करून युध्दात लढायला पाठवले जाऊ शकते म्हणून नागरिक देशच सोडण्याचा मार्ग पत्करत आहेत.
कशाची अपेक्षा करावी हेच आम्हाला समजेनासे झाले आहे. देशाकडे कोणतीही योजना नाही हेही आम्हाला दिसते आहे. ही जी अनिश्चिततेची भावना आहे तेच आमचे सगळ्यांत मोठे भय आहे. पलायनाच्या प्रयत्नात झालेल्या कोंडीत सापडल्यामुळे काही लोकांनी वाहनेही तशीच सोडून दिल्याचे सीएनएनने म्हटले आहे.
पलायन करत असलेला एक रशियन म्हणाला की, युक्रेनचे युध्द ब्लॅक अँड व्हाईट नाही. आज नाहीतर उद्या हा प्रश्न आम्हाला भेडसावणारच आहे. आमच्या देशाचा बचाव करण्यासाठी हे केले जात आहे, मात्र त्याचवेळी दुसऱ्या कोणत्या देशाचा भूभाग बळकावण्यासाठीही हे केले जाते आहे. दरम्यान, युध्द सुरू झाल्यापासून किमान 40 हजार रशियन नागरिकांनी जॉर्जियात आश्रय घेतला असल्याचा दावा रॉयटर्सने सूत्रांच्या आणि आकडेवारीच्या आधारे केला आहे.