मळद ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याचा प्रताप
रावणगाव- मळद (ता. दौंड) येथील ग्रामपंचायतीच्या एका कर्मचाऱ्याने बोगस पावती पुस्तकाद्वारे काही ग्रामस्थांकडून कर गोळा केला. ग्रामपंचायत प्रशासनाची आणि ग्रामस्थांकडून वाढीव कर आकारणी करून तसेच ती ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये न भरता फसवणूक केल्याचा प्रकार बुधवार (दि. 8) उघडकीस आला आहे.
सचिन गजानन साळुंखे असे फसवणूक करण्यात आलेल्याचे नाव आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, सचिन साळुंखे या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने बोगस पावतीद्वारे इलेजान गुलाब शेख यांना 6 हजार 461 रुपये अशी 2019-2020 या चालू वर्षाची करपट्टी आहे, असे सांगून त्यांच्याकडून ती वसूल केली. आणि त्यांना ग्रामसेवकाची सही शिक्का नसलेली खोटी पावती दिली. मात्र, तर ही पावती खोटी असल्याचा शेख यांना संशय आल्याने रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष राहुल भालेराव यांनाही दाखविली. त्यानंतर शेख आणि भालेराव यांनी ग्रामविकास अधिकारी कोमल खोमणे यांच्याकडे विचारणा केली असता शेख यांच्याकडे ग्रामपंचायत रजिस्टर नुसार 4 हजार 374 रुपये एवढीच करपट्टी असल्याचे सिद्ध झाले.
या अनुषंगाने ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांच्या कर आकारणीमध्ये सचिन साळुंखे याने खोट्या पावत्या देऊन अनेक ग्रामस्थांची लूट केल्याचे निष्पन्न होत आहे.
या तक्रारीच्या अनुषंगाने मळद ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये साळुंखे हा दोषी आढळला असून त्याने लेखी जबाब देऊन गुन्हा कबुल केला आहे. यामध्ये गावातील 8 ग्रामस्थांची फसवणूक करून हजारो रुपये लाटल्याचे दिसून येते आहे. ग्रामसभेमध्ये या कर्मचाऱ्यास बडतर्फ करून पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करून तो ठराव गटविकास अधिकारी पंचायत समिती दौंड यांच्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.