बाणेर : केंद्र सरकारच्या नदी सुधार योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांना स्थानिक नागरिकांसह पर्यावरण प्रेमी नागरिकांनी व संघटनांनी झाडांना मिठ्या मारून तीव्र विरोध दर्शविला. बाणेर येथील कलमाडी हायस्कूल ते मुळा राम नदी संगमापर्यंत पर्यावरण प्रेमी नागरिकांनी रॅली काढून तेथील असलेल्या झाडांना मिठी मारून चिपको आंदोलन केले.
यावेळी प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, लद्दाख मधील पर्यावरण प्रेमी सोनम वांगचुक उपस्थित होते. या आंदोलनात हजारो नागरिकांनी सर्व वयोगटातील नागरिकांनी सहभाग घेतला. प्रशासकीय यंत्रणेला वारंवार सांगूनही या ठिकाणी सुरू असलेले काम बंद होत नाही. यामुळे या चिपको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पंतप्रधानांना या विषयात गांभीर्याने लक्ष घालण्यासाठी हा प्रकल्प पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असल्याने बंद करण्यात यावा अशा आशयाचे हजारो पत्र लेखन करण्यात आले.
त्याचबरोबर उपस्थित नागरिकांनी झाडाला मिठ्या मारून फोटो काढून स्टेटस ठेऊन पर्यावरण जागृतीसाठी स्टेटसला ठेवण्यात आले. यावेळी शाळेतील मुलांनी पर्यावरण व नदी सुधारणेवर गाणे म्हणून जनजागृती केली. त्याचबरोबर अभिनेते सयाजी शिंदे यांनीही नदीवरील गाणी झुळझुळ नदीचे पाणी हे जनजागृतीसाठी म्हटले. नागरिकांमध्ये उत्साह वाढवण्याचं काम केले. यामध्ये नदीचे होत असलेले प्रदूषणाची व्यथा व गळचेपी या गाण्यातून मांडण्यात आली. विविध बॅनर व पोस्टर घेऊन या ठिकाणी पर्यावरण विरोधी होत असलेल्या कामाचा निषेध करण्यात आला.
शहरातील नदीची परिस्थिती बिकट होत आहे. नद्या ह्या देशाच्या रक्तवाहिन्या असून त्या दूषित झाल्या तर देश दूषित होईल. नद्यांचा विकास म्हणजे त्याचा कॅनल करणे गटार करणे नाही. त्यामुळे मुळा रामनदी संगम परिसरातील विकास कामांना आळा बसेल. राज्य शासनाने, पुणे महानगरपालिकेने यासंदर्भात जरूर विचार करावा आणि नदीला जिवंत ठेवावे. असे पर्यावरण प्रेमी अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले.
आपल्याला जगण्यासाठी नदी वृक्ष यांची आवश्यकता असून ते वाचवण्यासाठी आपण सर्व एकत्र आलात याचा मला आनंद आहे अभिमान आहे आणि आपला आवाज लोकशाही मार्गाने राज्यकर्त्या पर्यंत पोहोचेल आणि ते यावर योग्य तो निर्णय घेतील अशी मला अपेक्षा आहे. श्वास आणि पाण्यापेक्षा कुठलीच गोष्ट महत्त्वाची नाही त्यामुळे पाणी आणि हवा वाचवण्यासाठी आज आम्ही एकत्र आलो आहोत. पर्यावरण वादी कार्यकर्ते सोनम वांगचुक म्हणाले.
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मात्र या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक जमून देखील त्यांच्या भावना ऐकण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षातर्फे मात्र कोणीही उपस्थिती लावली नाही.