मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांचा पुढाकार
पुणे – दुबईत अडकून पडलेल्या गरजू भारतीयांना मायदेशी परत पाठवण्यासाठी मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी 186 रोजगारवंचित व निर्धन महाराष्ट्रीय कामगारांना स्व-खर्चाने चार्टर्ड फ्लाईटने पाठवले होते.
दुसऱ्या फेरीत 136 महाराष्ट्रीयांची दुसरी तुकडी परतली. महाराष्ट्रातील 65,000 हून अधिक लोक दुबईत अडकून पडले आहेत. दुबईस्थित अल अदील ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष डॉ. धनंजय दातार यांनी कंपनी सामाजिक दायित्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत 3500 गरजू भारतीयांचा खर्च उचलून त्यांना भारतात रवाना केले. यासाठी डॉ. दातार यांनी 3 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे.
प्रवाशांना मदतीसाठी अल अदील कंपनीच्या वतीने संचालक सौ. वंदना दातार, हृषिकेश दातार व रोहित दातार तसेच प्रवाशांतर्फे धनश्री पाटील, तिकिटांच्या व्यवस्थेसाठी राहुल तिळपुळे व अकबर ट्रॅव्हल्सचे सुलेमान इक्रम यांची मदत होत आहे. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे.