fbpx

मागणीअभावी हजारो लिटर्स ‘हॅण्ड सॅनिटायझर’चा साठा पडून

  • ज्वलनशील साठा सांभाळून ठेवताना केमिस्टला येताहेत नाकीनऊ

पिंपरी – करोनाचा प्रदुर्भाव टाळण्यासाठी प्रभावी ठरलेल्या हॅण्ड सॅनिटायजरचा हजारो लिटर्सचा साठा होलसेल व किरकोळ विक्री करणाऱ्या व्यायापाऱ्यांकडे पडून आहे. काही महिन्यांपूर्वी तुटवडा आणि प्रचंड मागणी असलेल्या सॅनिटायझरची मागणी आता मात्र अचानक घटली आहे. त्यामुळे आता या ज्वलनशील साठ्याची निर्धोकपणे साठवणूक करण्याचे मोठे आव्हान केमिस्टपुढे उभे राहिले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मार्च महिन्यात देशभरात लॉकडाऊन करण्यात आला. त्यानंतर करोनाला रोखण्यासाठी वारंवार हात धुणे, सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे व मास्क लावणे या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रसिद्दी करण्यात आली. त्यामुळे मास्क आणि हॅण्ड सॅनिटायजरला अचानक मोठी मागणी वाढली. त्यामुळे मर्यादीत साठा असलेल्या सॅनिटायजरचे दर दुपटी-तिपटीने वाढले. पाच लिटर सॅनिटायजरचा दर एप्रिलमध्ये 1200 रुपयांवर पोहोचला होता. तरीदेखील सॅनिटायजर पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने केंद्र सरकारने हस्तक्षेप करत, देशभरातील साखर कारखान्यांकडे अल्कोहोल निर्मितीसाठी उपलब्ध असलेल्या रसायनामधून सॅनिटायजर उत्पादनाला परवानगी दिली.

साखर कारखाने हॅण्ड सॅनिटायजरच्या उत्पादनात उतरल्याने व्यापारी कंपन्यांना याचा मोठा फटका बसला. पुणे जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांमधून लाखो लिटर्स हॅण्ड सॅनिटायझरचे उत्पादन घेण्यात आले. परिणामी उच्च दर्जाच्या सॅनिटायझरचे खुल्या बाजारातील भाव नियंत्रणात आले. आता उच्चदर्जाचे सॅनिटाजयरचे पाच लिटरचे कॅन 400 ते 600 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे.

सध्या साखर कारखान्यांकडे लाखो लिटर सॅनिटायझरचा साठा पडून असल्याने, या साठ्याचे करायचे तरी काय? असा प्रश्‍न संचालकांना पडला आहे. चिंचवड स्टेशन येथील दवा बाजारात असलेल्या औषधांच्या होलसेल व्यावसायिकांकडे हजारो लिटर्स हॅण्ड सॅनिटायझजरचा साठा पडून आहे. शहरात केवळ दवा बाजार, मेडीलकच नव्हे तर स्टेशनरी, किराणामाल विक्रीच्या दुकानांमध्येदेखील सॅनिटायजर सहज उपलब्ध होत आहे.

कमी झाली सतर्कता?
शहरातील करोनाचे आकडेही कमी होऊ लागले. ज्यांच्या खिशात कायम सॅनिटायझर असायचे त्यांनी देखील वापर कमी केला. घरात, कार्यालयात, दुकानांत पूर्वी सर्वांच्या वापरासाठी ठेवण्यात आलेल्या सॅनिटायझरच्या बाटल्या आता अनेक दिवस रिकाम्या होत नाहीत. तसेच काहींनी या बाटल्याही हटविल्या आहेत. नागरिकांमध्ये आता पूर्वीप्रमाणे सर्तकता दिसून येत नसल्याने सॅनिटायझरचा वापर घटला आणि स्टॉक वाढू लागला आहे.

हजारो मास्कही पडून
करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने सॅनिटायझर व मास्कचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे मास्क निर्मिती करणाऱ्यांकडे हजारो मास्क पडून आहेत. धुवून पुन्हा वापरता येण्यासारखे मास्क नागरिक अधिक वापरत असल्यामुळे मास्कच्या विक्रीतही मोठी घट झाली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव घटल्याने खुल्या बाजारातील हॅण्ड सॅटिायझरची विक्री ठप्प झाली आहे. त्यामुळे सॅनिटायजरची खरेदी ही विक्रेत्यांच्या दृष्टीने ही मृत गुंतवणुक ठरली आहे. त्यामुळे आता हे ज्वलनशील रसायन सांभाळण्याची वेळ औषध विक्रत्यांवर आली आहे.
विवेक तापकीर, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशन,

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.