पुणेकरांचा सकारात्मक प्रतिसाद
पुणे – महापालिकेच्या सायकल क्लबला अखेर पुणेकरांनी सकारात्मक प्रतिसाद देणे सुरू केले असून या क्लबच्या सदस्य संख्येने 1 हजाराचा टप्पा पार केला आहे. तसेच या क्लबचे सदस्यपद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात महापालिकेकडे चौकशी केली जात असल्याचे चित्र आहे. योजनेबाबत प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत असलेली जनजागृती आणि या उपक्रमात मोठ्या प्रमाणात राजकीय नेतेही उपस्थित होत असल्याने ही सदस्य संख्या वाढत आहे.
महापालिकेकडून शहराच्या पर्यावरण संवर्धन तसेच नागरिकांच्या आरोग्यासाठी एकात्मिक सायकल विकास आराखडा केला आहे. त्यानुसार शहरासाठी मागील वर्षी एकात्मिक सायकल योजना जाहीर करण्यात आली. त्या अंतर्गत शहरात पालिकेकडून तब्बल 10 हजार सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र, या योजनेला घरघर लागली असून ही योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, या योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी पालिकेकडून सुरूवातीला महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सायकल क्लब स्थापन करण्यात आला होता. त्यात अवघे 30 ते 40 कर्मचारी होते.
हे कर्मचारी पालिकेचे कार्यक्रम तसेच इतर सुट्टीच्या दिवशी शहरात सायकल फेरी काढत असत, हळुहळू त्यात सदस्यांची संख्या वाढू लागली, राजकीय नेत्यांसह, शहरातील सायकल क्लब तसेच नियमित सायकल चालवणारेदेखील उपक्रमात सहभागी होण्यास सुरूवात झाली. त्यानंतर हळुहळू या क्लबची सदस्य संख्या वाढण्यास सुरूवात झाली. तर महापौर आणि उपमहापौरांनी महिन्यातील पहिल्या मुख्यसभेला सायकल वरून येणार असल्याचे जाहीर करत, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी सुरू केल्याने या क्लबची सदस्य संख्या आता हजारावर गेली आहे. त्यामुळे योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने प्रशासनाकडून लवकरच या योजनेअंतर्गत वर्षभराचे उपक्रम केले जाणार असून नागरिकांना त्याची माहिती दिली जाणार आहे