मनिला (फिलीपाईन्स)- वॅमको या अतिशक्तीशाली वादळाच्या संभाव्य धोक्यामुळे फिलीपाईन्सच्या पूर्वकिनारपट्टीजव्ळील हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. हे वादळ उद्या संध्याकाळपर्यंत फिलीपाईन्सच्या पेंटॅनुगान, कुएन्झोन या प्रांतांना थडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वादळामुळे अतितीव्र स्वरुपाचे वारे वाहण्याची आणि मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. यामुळे मालमत्तेचे मोठे नुकसान होण्याचा धोकाही वर्तवण्यात येत आहे.
वॅमको वादळ काल रात्रीच कुएन्झोन येथील जनरल नकारच्या जवळपास पोहोचले आहे. सध्या या वादळामुळे ताशी 156 किमी वेगाने वारे वहात आहेत. हा वेग ताशी 255 किमी पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या वर्षी फिलीपाईन्सला थडकणारे ते 21 वे वादळ असणार आहे. दरवर्षी फिलीपाईन्सला किमान 20 वादळांचा फटका बसतो.