अयोध्या, दि. 16 – अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरात देणगी मोहीम राबवण्यात आली होती. देशभरातून लाखो लोकांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी देणग्या दिल्या. काहींनी रोख रकमेच्या स्वरूपात, काहींनी ऑनलाईन ट्रान्स्फर, तर काहींनी चेकच्या स्वरूपात या देणग्या दिल्या. मात्र, देणग्यांच्या या चेकपैकी विश्व हिंदु परिषदेने गोळा केलेले तब्बल 15 हजार चेक बाऊन्स झाले आहेत.
ही बाब राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या ऑडिट रिपोर्टमधून उघडकीस आली आहे. या संबंधित देणगीदारांना पुन्हा देणगी देण्याचे आवाहन ट्रस्टकडून करण्यात येत आहे. दरम्यान, यातले अनेक चेक हे संबंधित खात्यांमध्ये पुरेशी रक्कम शिल्लक नसल्यामुळे बाऊन्स झाले आहेत, तर अनेक चेक हे तांत्रिक समस्येमुळे बाद ठरवण्यात आले आहेत.
ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा म्हणाले, चेक मंजूर करण्यात आलेल्या तांत्रिक समस्यांचं निराकरण करण्यासंदर्भात बॅंकाना विनंती करण्यात आली आहे. तसेच, संबंधित देणगीदारांना पुन्हा देणगी देण्याची विनंती देखील करण्यात आली आहे. बाऊन्स झालेल्या चेकपैकी 2 हजार चेक अयोध्येमधूनच गोळा करण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, राम मंदिराच्या उभारणीसाठी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्यात आली. याच ट्रस्टच्या माध्यमातून देशभरात प्रस्तावित राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगी गोळा करण्याची मोहीम राबवण्यात आली. मात्र, त्यातले 22 कोटी रुपयांचे एकूण 15 हजार चेक बाऊन्स झाले आहेत. शिवाय यातले 2 हजार चेक खुद्द अयोध्येमधल्याच देणगीदारांनी दिल्याची देखील माहिती समोर आली आहे.