राष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले

 नातेसंबधांना प्राधान्य देण्याचा प्रश्‍नच नाही ; कोणतेही धर्मसंकट नाही, मी भाजपबरोबरच

राहुरी: लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आमदार अरुण जगताप किंवा आमदार संग्राम जगताप यांना दिली तरी आपल्यासमोर कोणतेही धर्मसंकट नाही. आपण भाजपबरोबरच आहोत. नातेसंबधांना प्राधान्य देण्याचा प्रश्‍नच नाही, असे आमदार शिवाजी कर्डिले यांनी आज स्पष्ट केले.

राष्ट्रवादीने आ. कर्डिले यांची कोंडी करण्याच्या हेतूने त्याचे व्याही आमदार अरूण जगताप व जावई आमदार संग्राम जगताप यांच्यापैकी एकाला लोकसभेची उमेदवारी देण्याची भूमिका घेतली आहे. त्यात राहुरी मतदारसंघात आ. कर्डिले व डॉ. विखे यांचे सख्य पाहता आ. कर्डिलें पुढे धर्मसंकट उभे राहणार याबाबतचे वृत्त नुकतेच दैनिक “प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्या संदर्भात आ. कर्डिले यांनी आपली भुमिका दैनिक “प्रभात’ जवळ स्पष्ट केली. ते म्हणाले, कॉंग्रेसचे युवानेते डॉ. सुजय विखेंचा नुकताच भाजपत प्रवेश झाला. या सर्व विषयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी माझ्यावर पूर्णविश्‍वास दाखविला. हा निर्णय जरी वरिष्ठपातळीवर झाला असला तरी माझ्यावर या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी टाकलेली होती.

मुंबईत प्रवेश प्रक्रियेत देखील मला पूर्णपणे विश्‍वासात घेवूनच करण्यात आली आहे. राजकारणात विश्‍वास सर्वाधिक महत्वाचा आहे. फसवाफसवीचे राजकारण फार काळ चालत नाही. मी तसे कधीच केले नाही.करणारही नाही. मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा मी उमेदवार होतो. पक्षातील गटबाजीमुळेच माझा पराभव झाला होता. पक्षातील लोकांनीच मला फसविले.पराभवानंतर गुणवत्ता निकषावर मला राष्ट्रवादीची राहुरी मतदारसंघातून उमेदवारी हवी होती. परंतू राष्ट्रवादीने ती देण्यास ठाम नकार दिला. माझे राजकारण त्याचवेळी संपले होते. मात्र भाजपचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी तत्कालीन आमदार चंद्रशेखर कदम यांची सहमती घेवून मला या मतदार संघातून पक्षाची उमेदवारी दिली आणि माझे राजकीय आस्तित्व कायम राहिले. ही गोष्ट मी कधीच विसरु शकत नाही. भाजपतील माझे वर्चस्व वाढत आहे. हे सहन न झाल्याने अशा चर्चा सुरु आहेत.

राष्ट्रवादीने अगदी माझ्या मुलींपैकी कोणाला उमेदवारी दिली तरीही मी धर्मसंकटात नाही. अशा उमेदवारीने माझी राजकीय कोंडी करता येणार नाही. राज्य पातळीवरील नेत्यांना जरी तसे वाटत असले, तरी मी त्यावर निश्‍चितच मात करील. कौटुंबिक पातळीवर मी आवश्‍यक तेथे ही भूमिका फार आधीच स्पष्ट केलेली आहे. आज कोणी काहीही संशय घेतले तरीही लोकसभा निवडणूक निकालाने माझ्या पक्षाला महत्व देण्याच्या भूमिकेवरच शिक्कामोर्तब झालेले असेलच. तोपर्यंत चर्चा होतच राहतील. पक्षात माझे विषयी गैरसमज पसरविण्याचे प्रयत्न निश्‍चितच असफल होतील. माझा कोणताही सोयरा राष्ट्रवादीचा उमेदवार असला तरी मी भाजपचे उमेदवारा सोबतच आहे, असेही आ. कर्डिले यांनी स्पष्ट केले. माझ्या या भूमिकेतूनच मी कथित धर्मसंकटावर मात करील असे ते म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)