‘ज्यांना पक्ष सोडून जायचे, त्यांनी खुशाल जावे…’; चंद्रशेखर बावनकुळे यांचा हर्षवर्धन पाटलांना टोला

मुंबई – ज्यांना पक्ष सोडून जायचे आहे, त्यांनी खुशाल जावे. भाजप कुणालाही अडवणार नाही. पण त्यांनी थोडा संयम ठेवला तर पक्ष निश्चितच काहीतरी निर्णय घेईल, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन महाविकास आघाडीतील घटकपक्षांत जाण्याच्या तयारीत असणाऱ्या नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. त्यांचा रोख माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे होता.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभेच्या उमेदवारीवरून महायुतीत रणकंदन माजले आहे. महायुतीच्या जागावाटपात ही जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची चिन्हे आहेत. पण भाजप नेते हर्षवर्धन पाटील या जागेसाठी आग्रही असल्यामुळे भाजप नेतृत्वाची मोठी अडचण झाली आहे.
त्यातच हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे ते लवकरच शरद पवार गटात जातील असा दावा केला जात आहे. ते या इंदापूर येथून अजित पवारांच्या पक्षाचे आमदार दत्तात्रय भरणे यांना आव्हान देण्याची शक्यता आहे.
बावनकुळे पुढे म्हणाले, ज्यांना पक्ष सोडून जायचे आहे, त्यांनी खुशाल जावे. पक्ष कुणालाही अडवणार नाही. त्यांनी जर विचार केला असेल तर आम्ही त्यांना थांबवू शकत नाही. पण थोडा संयम ठेवला तर पक्ष निश्चितच काहीतरी निर्णय घेईल.
महायुतीमध्ये विधानसभेच्या ज्या जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जातील, त्या ठिकाणी मागच्या निवडणुकीत लढलेले आमचे नेते आहेत. पण आता त्यांना थांबायचे नाही. शेवटी त्यांनी थांबावे अशी आमची इच्छा आहे. आमची त्यांना विनंतीही आहे. पण शेवटी त्यांनी विचारच केला असेल तर आम्ही त्यांना थांबवू शकत नाही.





