दिवाळीनंतर करोना लसीचा एक डोस घेतलेल्यांनाही लोकल प्रवासाची मुभा – राजेश टोपे

मुंबई – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला असल्याने अनेक नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. आता महाराष्ट्र हळूहळू संपूर्ण अनलॉक होण्याच्या दिशेने प्रवास करत आहे. शाळा, मंदिरं सुरु झाल्यानंतर आता दिवाळीनंतर करोनाच्या लसीचा एक डोस घेतलेल्या व्यक्‍तींना मॉलमध्ये प्रवेश मिळणार असून लोकलने प्रवाश करण्याचीही मुभा मिळणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. याबाबत दिवाळीनंतर मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राजेश टोपे म्हणाले, आताच दसरा झाला असून दिवाळी तोंडावर आली आहे. संपूर्ण संणामध्ये लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मंदिरं, चित्रपटगृहेही खुली करण्यात आली आहेत. यानंतर आता करोना रुग्णांची संख्या कमी होते की जास्त होते याचा आढावा घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

दिवाळीत करोना रुग्ण संख्येचा आढावा घेऊन लोकांना होणाऱ्या या असुविधेतून वाचवण्यासाठी लसीची एक मात्रा देखील पुरेशी ठरणार आहे. टास्क फोर्सच्या सहमतीने मुख्यमंत्री दिवाळीनंतर निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.

टोपे म्हणाले की, राज्यात मोठ्या स्तरावर हर्ड इम्युनिटी आलेली असेल आणि टास्क फोर्स, आरोग्य विभागाची सहमती असेल तर असा निर्णय घेतला जाऊ शकतो. कोविशील्डच्या पहिल्या डोसनंतर 84 दिवसांचा कालावधी दुसऱ्या डोससाठी दिला आहे. त्यामुळे मोठे अंतर असल्याने असुविधा होते. त्यामुळे आरोग्याची बाब लक्षात घेऊन यावर निर्णय होईल, असेही टोपे म्हणाले.

दरम्यान, राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकार अनेक गोष्टी अनलॉक करत आहेत. राज्य सरकारने नुकतंच शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 22 ऑक्‍टोबरनंतर सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरु होणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.