करोनावरील लसींबाबत अफवा पसरवणाऱ्यांची खैर नाही

नवी दिल्ली, – करोनावरील लसींच्या प्रभावीपणाविषयी पसरवल्या जाणाऱ्या अफवांची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. त्यातून सरकारने तशाप्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत.

करोनाविरोधातील निर्णायक लढ्याचा भाग म्हणून भारतात लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून पसरत असणाऱ्या अफवांमुळे लसींची सुरक्षितता आणि त्यांचा प्रभावीपणा याविषयी साशंकता निर्माण होत आहे. त्याचा संदर्भ देऊन केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना एक पत्र पाठवले. त्यामध्ये त्यांनी लसींविषयीच्या अफवांना आळा घालण्यासाठी पाऊले उचलण्यास सांगितले आहे.

अफवा परवणाऱ्यांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या तरतुदींतर्गत कारवाई केली जाऊ शकते, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. देशात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्‍सिन या लसी दिल्या जात आहेत. त्या दोन्ही लसी सुरक्षित असल्याचे राष्ट्रीय नियामक प्राधिकरणाला आढळले असल्याकडेही भल्ला यांनी लक्ष वेधले आहे.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.