पुणे : पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांना अडवून कोयत्याचा धाक दाखवत लुटमार करण्यासह एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणातील दोघा आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. ३० जून रोजी दौंड भागातील स्वामी चिंचोली येथे ही घटना घडली होती.
आमिर सलीम पठाण (३०, रा. अकलूज, जि. सोलापूर) आणि विकास नामदेव सातपुते (२८, रा. भिगवण स्टेशन, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
ही घटना ३० जून रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास दौंडजवळील स्वामी चिंचोली परिसरात घडली. पंढरपूरच्या दिशेने निघालेला वारकऱ्यांचा एक टेम्पो चहा पिण्यासाठी थांबला असताना, दुचाकीवरून आलेल्या दोघा व्यक्तींनी टेम्पोतील वारकऱ्यांच्या डोळ्यांत मिरची पूड फेकून गोंधळ उडवला. त्यांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले.
या गोंधळाचा फायदा घेत एकाने तरुणीवर अत्याचार केला. या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दहा पथके तयार केली होती.
त्यामाध्यमातून मागील तीन ते चार दिवसांपासून आरोपींचा माग काढला जात होता. आरोपींची स्केचेस तयार करून विविध संशयित गुन्हेगारांची कसून चौकशी करण्यात आली. यानंतर अखेर तांत्रिक तपासावरून पोलिसांनी आमिर आणि विकास सातपुते या दोघांना अटक केली.