सातारा – माण-खटाव विधानसभा निवडणूकीचे तिकीट ठरवण्यासाठी आघाडीचे ठरलयवाले दोन महिने फलटण आणि बारामतीकरांचे तळवे चाटत होते. त्या प्रभाकर देशमुखांचे लोणचे करुन ज्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालण्यात आली आहे त्या प्रभाकर घार्गेंची अस्मिता डॉ. येळगावकर आणि रणजित देशमुखांनी निवडणूक लढविली होती तेव्हा कुठे गेली होती. अस्मितेच्या बाता मारुन माण आणि खटावमध्ये भांडणे लावण्याचे घार्गेंचे मनसूबे सूज्ञ जनता निश्चित उधळून लावणार असल्याचा विश्वास आ. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
निमसोड गटातील गावभेट दौऱ्यादरम्यान जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते. आ. गोरे म्हणाले, गेली १५ वर्षे मी माण – खटावच्या जनतेची रात्रंदिवस मनोभावे सेवा केली आहे. माय बाप जनतेने आणि कार्यकर्त्यांनी सांगितलेली सर्व विकासकामे मार्गी लावली आहेत. आज प्रत्येक गावात आपण केलेल्या कोट्यवधींच्या कामांचे बोर्ड पाहून विरोधकांना जनतेसमोर जायला अधिकारच राहिला नाही.
विरोधातील उमेदवार खटावची अस्मिता सांगतात पण कधी कोणत्या गावात आणि कोणते विकासकाम घेऊन ते फिरलेत हे सांगायलाही त्यांना तोंड नाही. गावागावात भांडणे लावायचा त्यांचा उद्योग आहे. आता त्यात विस्तार करुन ते तालुका तालुक्यात भांडणे लावत आहेत. खटावचेच डॉ. येळगावकर आणि रणजित देशमुख मागे निवडणुकीत उभे होते तेव्हा घार्गेंची खटाव अस्मिता कुठे गेली होती. ते अस्मितेच्या बाता मारत आहेत.
मात्र, आम्ही माण – खटावचा पाणीप्रश्न अंतिम टप्प्यात आणून खरी अस्मिता जपत आहोत. शरद पवारांनी या भागातून मते घेतली मात्र पाणीप्रश्नाबाबत त्यांचे कर्तुत्व शून्यच राहिले. आजपर्यंत घार्गे कोणत्या पक्षात आहेत हे त्यांनापण माहित नाही. ते कोणत्याच पक्षात स्थिर नाहीत. उमेदवारीसाठी सगळ्यांनी ठरवून प्रभाकर देशमुखांचे लोणचे केले. त्यांना विरोध करुन घार्गेंनी उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे. देशमुखांची इतकी बेइज्जती होवूनही ते पण तिथेच राहिले आहेत.कोविड काळात मी जनतेची सेवा केली. हजारो रुग्णांवर उपचार केले. विरोधी उमेदवार मात्र आपण भले आणि आपले कुटुंब भले अभियान चालवत होते असा टोलाही आ. गोरेंनी लगावला.
ज्यांना मदत केली तेच विरोधी उमेदवार
अडचणीच्या काळात आ. गोरेंनी घार्गेंना मदत केली. जिल्हा बॅंक,बाजारसमिती निवडणूकीत सहकार्य केले. तेच घार्गे विरोधात उमेदवार म्हणून उभे आहेत. समोर कुणीही असले तरी आपला पाणीप्रश्न तडीस लावणाऱ्या आ. गोरेंना जनतेने आशिर्वाद दिले आहेत. माण आणि खटावला एकाच आईची लेकरे मानून हजारो कोटींची विकासकामे साकारणाऱ्या आ. गोरेंच्या पाठिशी जनता ठाम असल्याचे डॉ. येळगावकर आणि धनंजय चव्हाण यांनी सांगितले.