सोशल मीडियावर भावनांचा पाऊस
पुणे – संध्याकाळ झाल्याने गडाचे दरवाजे बंद झाले. गडावर दूध विकायला गेलेल्या “हिरकणी’ने खूप विनवण्या केल्या, तरी गडकऱ्याने दरवाजा उघडला नाही. पण ती भुकेल्या बाळाच्या ओढीने त्या हिरकणीने अवघड कडा सर करत आपल्या बाळापर्यंत पोहोचली आणि बाळाला पदराखाली घेतले. त्या हिरकणीचा खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्कार केला. ही कथा सर्वश्रुतच आहे. मात्र, या मातृत्त्वाच्या दानालाच रिते करण्याच्या गुरुवारी घडलेल्या प्रकाराने सोशल मीडियावर भावनांचा पाऊस पडला.
“ती’ मुलगी, इतकी हसरी, आपल्याला सुरक्षित हातांनी उचलले आहे, या जाणीवेनेच क्षणभरात ती त्यांच्याकडे पाहून हसायला लागली. गालावर, कपाळाला तीट, डोक्यावर कुंची, अंगात चांगल्या प्रतीचे कपडे असे त्या “हसरी’चे फोटो पाहून कोणाचेही मन द्रवल्याशिवाय राहणार नाही. 10 तासांतच या “हसरी’च्या काका, काकूंचा, आई-वडिलांचा पत्ता कोथरूड पोलिसांनी शोधून काढला. अनेक वाईट गोष्टी सोशल मीडियावर क्षणात व्हायरल होत असतात, परंतु हाच सोशल मीडिया या “हसरी’बाबतीत वरदान ठरला आणि तिच्या कुटुंबियांचा ठावठिकाणा सापडला. मात्र, 10 तासांत तिचे फोटो व्हायरल झाले, त्यातून आलेल्या प्रतिक्रिया माणूसकी अजून जिवंत असल्याची साक्ष देणाऱ्या होत्या. अनेक स्तनदा मातांनी स्वत:च्या पदराखाली घेण्याची तयारी दाखवली, तर ज्यांना मूलबाळ नाही ते तिला दत्तक घेण्याला पुढे सरसावले. काहींनी तर तिचे नातेवाईक मिळेपर्यंत सांभाळण्याची तयारी दर्शवली. काहींनी तिचे “हसरी’ असे नामकरण केले.
पावसाळा सुरू आहे परंतु मूल जेव्हा पोलिसांच्या ताब्यात आले, तोपर्यंत पाऊस पडला नाही. कुत्र्यापासून बचावल्याबद्दलही काहींना हायसे वाटले. बाळाचे कपडे पाहून अनेकांनी “चांगल्या घरातील बाळ आहे’ असे म्हणत आईवडिलांनी त्याला सोडल्याबद्दल खूप दूषणे दिली, आणि ते सापडले तर त्यांना कडक शिक्षा द्या, अशी मागणी केली. जन्मल्यावर लगेच असे रस्त्यावर सोडून देणारे अनेक सापडतात. परंतु, चार-पाच महिने सांभाळून सोडणारी ही माता म्हणजे “वैरीण’च असल्याचे म्हणत अनेकांनी रागही व्यक्त केला.