नारायणगाव – चलनी नोटा लगेच डबल करतो असे सांगत बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिसांनी सयुक्तिक सापळा रचून जेरबंद केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.
प्रमोद भगवान साळवे, बाबासाहेब बापू दाते (दोघे रा. कासारी, ता. पारनेर, जि. अहमदनगर), समीर दशरथ वाघ (रा. गुर्वेवाडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर), अमोल बन्सी भोसले (रा. भोसलेवाडी- पेमदरा, ता. जुन्नर) असे बेड्या ठोकण्यात आलेल्यांची नावे आहेत. बाळू कारभारी पवार (बोटा, ता. संगमनेर) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबतची माहिती अशी की, गेल्या 15 दिवसांपासून बाबासाहेब दाते हा बाळू पवार यांना वारंवार फोनकरून तुम्ही नोटा दिल्यास त्या नोटा लगेच डबल करतो असे सांगत होता; परंतु त्यास नकार देवूनही दाते हा वारंवार फोन करत असल्याने पवार यांना मंगळवारी (दि. 1) नारायणगाव हद्दीतील 14 नंबर चौकात समर्थ वडा पाव सेंटरजवळ बोलावून घेवून दुपारी दोनच्या सुमारास चारही आरोपी मोटारसायकल ( एमएच 14 जीक्यू 5841) वरून येऊन नोटा डबल करून देतो, असे सांगुन पवार यांच्याकडून 25 हजार रूपये घेतले व त्यांना 50 हजार रूपयांच्या बंडलवर पुढे व मागील बाजुस प्रत्येकी 1 अशा दोन खऱ्या नोटा लावुन बाकीच्या 98 नोटा खोट्या देत पवार यांची 49 हजार रूपयांची फसवणूक केली असे फिर्यादित नमूद केले आहे.
त्यानुसार गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे, दत्तात्रय जगताप ,शंकर जम,शरद बांबळे, दीपक साबळे ,रौफ इनामदार,चंद्रकांत जाधव, काशीनाथ राजापुरे व नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक भीमा लोंढे व योगेश गारगोटे या पथकाने 14 नंबर परिसरात शोध घेऊन आरोपींचा पाठलाग करून शिताफीने गुन्ह्यातील मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह पकडले. पुढील तपस नारायणगाव पोलीस हे करीत आहेत .
चौघांवर आधीच गंभीर गुन्हे दाखल….
पकडलेल्या चौघांवर नारायणगाव, जुन्नर, खेड या पोलीस स्टेशनला खुन, दरोडा, चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी अमोल बन्सी भोसले याच्यावर आळेफाटा पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल असून तो गुन्हा केल्यापासून फरार होता.