पारनेर -पारनेर तालुक्यातील निघोज येथील एकाच कुटुंबातील चार तर सुपा येथील एक अशा पाच करोना संशयितांचे अहवाल गुरुवारी सकाळी प्राप्त झाले असून ते या पाचही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली.
पारनेर तालुक्यात निघोज येथील एकाच कुटुंबातील चौघांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. या अहवालाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. मात्र या पाचही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने तालुक्यातील जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला. यातील एका चार वर्षीय लहान मुलीची तब्येत चांगली झाली आहे. या पाच जणांना भाळवणी येथे 14 दिवस क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे.
सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला त्रास जाणवत असल्याने त्या व्यक्तीने जिल्हा रुग्णालयामध्ये स्वतःहून तपासण्यासाठी हजेरी लावली होती व त्यानंतर त्या व्यक्तीचे अहवाल गुरुवारी प्राप्त झाले. ही व्यक्ती राज्याबाहेरील असल्याचे समजते.
तालुक्यातील पाचही संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले असून या सगळ्यांची प्रकृती चांगली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पुढील चौदा दिवस त्यांना भाळवणी येथे क्वॉरंटाईन केले जाणार आहे.
डॉ. प्रकाश लाळगे, आरोग्य अधिकारी, पारनेर.