“त्या’ कर्मचाऱ्यांचे होणार पुनर्वसन

हाताने मैला उचलण्यास बंदी : आयुक्‍तांवर जबाबदारी निश्‍चित

पिंपरी – हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍तीला बंदी घालण्यात आली असून अशा कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी शासनातर्फे सक्षम प्राधिकारी घोषित करण्यात आला आहे. महापालिका स्तरावर आयुक्‍त, तर नगरपालिका स्तरावर मुख्याधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावर पूर्वी हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात असे. अशा कामगारांच्या नियुक्तीवर केंद्र शासनातर्फे बंदी घालण्यात आली आहे. त्याबाबतचा प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे हा कायदा सन 2013 मध्ये केंद्र शासनातर्फे पारित केला असून 6 डिसेंबर 2013 पासून हा कायदा लागू झाला आहे. या अधिनियमांच्या आणि नियमांच्या अंमलबजावणीसाठी सक्षम प्राधिकारी घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे नागरी भागामध्ये महापालिका आयुक्‍त, नगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायतचे मुख्याधिकारी, तर ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
हे सर्व अधिकारी आपापल्या स्तरावर काही किंवा पूर्ण अधिकार, तसेच त्यांचे कर्तव्य बजाविण्याचे कार्यक्षेत्र आपल्या कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना देखील प्रदान करू शकणार आहे. तसे निर्देश देखील शासनातर्फे देण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.