पुणे – करोनाच्या रुग्णांवर अवाजवी शुल्क आकारणी करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्याचबरोबर करोना आणि इतर आजार असलेल्या रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांची गय केली जाणार नाही, अशी ताकीद पवार यांनी यावेळी दिली.
विधानभवन येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली करोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले की, करोना रुग्णांवर वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.