“त्या’ दोन कंपन्यांना सात कोटींची भरपाई’

काळेवाडी फाटा ते देहू आळंदी बीआरटी : रस्त्याचे काम होणार सुरू
पिंपरी – काळेवाडी ते देहू-आळंदी या 45 मीटर रुंद बीआरटी मार्गात अडथळा ठरणाऱ्या एमआयडीसीतील दोन कंपन्यांना नुकसान भरपाईपोटी महापालिका प्रशासन सात कोटी रुपये देणार आहे. महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत या कंपन्यांचे अध्यक्ष व सचिव यांनी सात कोटींच्या नुकसान भरपाईवर सहमती दर्शविली आहे. या दोन्ही कंपन्यांची जागा महापालिकेच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांना नुकसान भरपाईची रक्कम अदा केली जाणार आहे.

काळेवाडी ते देहू-आळंदी या बीआरटी मार्गाचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून, या मार्गावर लवकरच बीआरटी सेवा सुरु करण्याचे सूतोवाच आयुक्‍त हर्डीकर यांनी केले होते. मात्र, 45 मीटरचा रस्ता विकसित करत असताना, चिंचवड एमआयडीसी हद्दीतील मे. इंडोलिंक व युरोसिटी इंडस्ट्रियल प्रिमायसेस या दोन कंपन्यांचा अडथळा येत होता. या दोन्ही कंपन्यांच्या स्थलांतरासाठी एमआयडीसीची मान्यता मिळणे आवश्‍यक होते. 2014 सालापासून हा विषय प्रलंबित होता.

त्यावेळी सव्वा सहा कोटी रुपये खर्च येणार होता. मात्र, चार वर्षे विलंब झाल्याने या खर्चामध्ये वाढ झाल्याने वाढीव खर्चानुसार साडे सात कोटी रुपये देण्याची मागणी या कंपन्यांकडून करण्यात आली होती. यावर आर्थिक व्यवहार्यता लक्षात घेत, नुकसान भरपाईपोटी सात कोटी देण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली होती. त्यावर कंपनीचे अध्यक्ष व सचिव यांनी ही नुकसान भरपाई रक्कम मान्य असल्याचे महापालिका प्रशासनाला कळविले आहे. या नुकसान भरपाई रकमेमध्ये इमारत बांधण्यासाठी सात कोटी रुपये व इतर येणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव येत्या बुधवारी (दि.29) होणाऱ्या स्थायी समोर ठेवण्यात आला आहे.

या दोन कंपन्यांमुळे बीआरटी मार्ग पूर्ण करण्यास अडचणी आल्या होत्या. ही जागा ताब्यात आल्यानंतर बीआरटी मार्गाकरिता महापालिका जागा उपलब्ध करुन देणार आहे. या ठिकाणचे बीआरटीचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे नियोजन असणार आहे. त्यानंतर पीएमपीएमएलने बस उपलब्ध करुन दिल्यानंतर या मार्गावर बीआरटी सेवा सुरु केली जाईल.

-विजय भोजने, प्रवक्‍ता- बीआरटी पिंपरी-चिंचवड महापालिका

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here