मुंबई – महाराष्ट्रासाठी करोनावरील लसींचा आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढवला जावा. तसेच, रेमडेसिविर आयातीला परवानगी द्यावी, अशा मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या व्हर्च्युअल बैठकीत बोलताना ठाकरे यांनी करोनाविरोधी लढा जिंकण्याचा विश्वास बोलून दाखवला.
महाराष्ट्रात लसीकरणासाठी पात्र ठरलेले 18 ते 44 वर्षे वयोगटातील 5.71 कोटी लाभार्थी आहेत. त्यांच्यासाठी लसींचे सुमारे 12 कोटी डोस लागतील. कमी कालावधीत तेवढ्या डोसचे उत्पादन शक्य होणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. लॉकडाऊनकडे अंतिम पर्याय म्हणून पाहण्याची सूचना मोदींनी केली. दुर्दैवाने, महाराष्ट्रावर कडक निर्बंध लादण्याची वेळ आली. मात्र, अर्थचक्रावर परिणाम होणार नाही यादृष्टीने आम्ही काळजी घेत आहोत, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.
…तर आपण स्वत:ला माफ करू शकणार नाही – केजरीवाल
ऑक्सिजन तुटवड्यामुळे जनतेला अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. ऑक्सिजनअभावी मोठी दुर्घटना घडू शकते. तसे झाल्यास आपण स्वत:ला माफ करू शकणार नाही. मुख्यमंत्री असूनही मी दिल्लीकरांना मदत करू शकत नाही, अशी हतबलता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बैठकीत बोलून दाखवली.