माळेगाव: माझी आणि शरद पवारांची ही औपचारिक भेट होती. दिवाळी असल्याकारणाने मी शरद पवार यांना भेटायला आलो होतो. शिवसेनेच्या सोबत सत्ता स्थापण्याचा आता सध्या कोणताही विचार नाही. त्याप्रमाणे पवार साहेबांनी कालच स्पष्ट केले की लोकांनी आम्हाला विरोधात बसण्याची संधी दिली, त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष सक्षम विरोधाची भूमिका पार पाडणार आहोत. लोकांचे प्रश्न समस्या ताकदीने सरकारपुढे मांडण्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बारामती येथील गोविंद बागेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना पवार म्हणाले की, आज शेतीची अत्यंत बिकट अवस्था आहे. कारखानदाऱ्या बंद होत आहेत, बेरोजगारी वाढत आहे. या महत्त्वाच्या प्रश्नाचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधक म्हणून जरूर विचार करणार असून आमच्या कार्यक्रमाची या पुढील दिशा ठरणार आहोत.
तसेच 30 तारखेला दुपारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलवले असल्याची माहितीही शरद पवार यांनी दिली