माझ्या उमेदवारीला थोरातांनीच केला विरोध ः डॉ. सुजय विखे

विखे – थोरात संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर; संगमनेर तालुक्‍यात केवळ विकासाच्या गप्पा
थोरात तुम्ही चुकीच्या माणसाला बोट लावलय

संगमनेर  –
माझा विरोध कोणत्याही व्यक्‍तीला नाही तर एका विशिष्ट वैचारिकतेला आहे. शरद पवारांनी स्वतः मुलाखतीत सांगितले की, सुजय विखेला उमेदवारी देण्यास सर्वात मोठा विरोध बाळासाहेब थोरातांनी केला. मात्र विरोध कशामुळे याचे उत्तर त्यांनी द्यावे. सुजय विखेने तुमचे काय नुकसान केले होते. फार चुकीचे केले आता परतफेड तर करावीच लागेल. मी काय राधाकृष्ण विखे पाटील नाही, तुम्ही चुकीच्या माणसाला बोट लावलय, असा इशारा डॉ. सुजय विखे पाटील यांनी थोरातांना दिला आहे.

संगमनेर शहरात डॉ. विखे एका सभेत बोलत होते. विखे भाजपमध्ये गेल्याने आता खऱ्या अर्थाने विखे-थोरात यांच्यातील संषर्घ सुरू झाला असून एकमेकांवर सध्या जोरदार चिखलफेक सुरू झाली आहे. विखे पुढे म्हणाले की, पंतप्रधान ज्यांना व्हायचं आहे ते नगरला मुक्कामी होते. मुख्यमंत्री ज्यांना व्हायचं आहे ते संगमनेर तालुक्‍यात सभा घेत आहे. तालुक्‍यात विकासाच्या गप्पा मारल्या जातात पण विकास कोणाचा झाला, हे मी सांगण्याची गरज नाही.

कारखान्याच्या संचालकांपासून ते ग्रामपंचायतींपर्यंत नातेवाईक आणि ठेकेदारच दिसतात. आज तालुक्‍यातील प्रश्‍न अद्यापही बाकी आहेत, इतके वर्षे सत्ता असूनही पाण्याचे प्रश्‍न सुटलेले नाहीत. तालुक्‍यात परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही. केवळ नेत्यांनी विधानसभा लढण्याचे स्वप्न पाहू नये तर कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आधी पुढे यावे. कार्यकर्त्यांनीदेखील प्रामाणिकपणे काम करावे नाही तर सकाळी युती आणि संध्याकाळी यशोधन असे होऊ देऊ नका. अशा शब्दात डॉ. विखे यांनी थोरातांना लक्ष्य केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.