अभिवादन – अपराजित योद्धा : थोरले बाजीराव पेशवे

-विठ्ठल वळसेपाटील

हिंदवी स्वराज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांनी मराठा साम्राज्याचे विस्तारवादी धोरण आखले. त्यावेळी बाजीरावाचे चातुर्य, युद्धकौशल्य नीतीविषयी छत्रपती शाहूंना ज्ञात होते. पेशवे बाळाजींच्या मृत्यूनंतर पेशवेपदासाठी रणधुरंधर असलेल्या त्यांच्या पुत्रास अर्थात बाजीरावास नेमले. या थोरल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याच्या सीमेचा उत्तर भारतात विस्तार केला. वेगवान हालचाल, शत्रू सावध होण्याआधीच घाव, साधी राहणी, न्यायप्रिय, स्वराज्याशी एकनिष्ठता अशा अनेक गुणाचे मिलाप असलेल्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या आज पुण्यस्मरण दिनानिमित्त वाहिलेली पुष्पांजली.

थोरले बाजीराव यांनी पेशवे पदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा त्यांचे वय अवघे 19 वर्षे होते. 20 वर्षांचे पेशवे पद आणि आयुष्य 40 वर्षांचे, या कारकिर्दीत 36 महत्त्वाच्या लढाया जिंकल्या त्याही गनिमी काव्याने. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले हिंदवी स्वराज्य व छत्रपती संभाजी महाराज यांनी उत्तरेतील राज्यांशी बांधलेले संधान याच्या जोरावर बाजीरावांनी उत्तरेत विस्तार केला. पालखेडची लढाई भारतीय इतिहासात महत्त्वपूर्ण मानली जाते. या लढाईने मराठा साम्राज्यात विश्‍वास निर्माण झाला. परदेशी इतिहासकार या लढाईचा सूक्ष्म अभ्यास करतात. बाजीरावांची नीतीतत्त्वे आजही व येणाऱ्या काळातही लष्कराला उपयुक्‍त आहेत.

1727 मध्ये मराठा साम्राज्यात वाद निर्माण झाला होता. त्यावेळी बाजीराव कर्नाटक मोहिमेवर होते. ही संधी पाहून निजामाने डोके वर काढायला सुरुवात केली आणि पुढील हालचाली सुरू केल्या. परिस्थिती पाहून छत्रपती शाहूंना पंतप्रतिनिधींनी समझोता करण्याचा सल्ला दिला. हे बाजीरावास समजतात प्रसंग बाका आहे हे ओळखून बाजीरावाने योग्य निर्णय घेतला. ऑगस्ट 1727 ला सेनेला सज्जतेचा आदेश दिला. नोव्हेंबर 1727 ला बाजीरावाने औरंगाबादच्या दिशेने चढाई करून जालन्यापर्यंतचा प्रदेश लुटला. या वेळी निजामाच्या सैन्याने बाजीरावाचा पाठलाग केला.

बाजीरावाचा मोर्चा बुऱ्हाणपुराकडे वळाला. निझामाचा सरदार इवाझ खान याने बाजीरावाचा पाठलाग सुरू केला. बाजीराव खानदेशातून गुजरातकडे निघाला. बाजीराव आपल्याला पतंगाप्रमाणे ओढीत नेत असल्याचे लक्षात येताच निजामाने डाव आखला. राजधानी पुण्यावर हल्ला केल्यास बाजीराव आपसूक जाळ्यात येईल म्हणून निजामाने दक्षिणेकडे सरकत उदापूर, अवसरी, पाबळ, खेड, नारायणगाव जिंकून पुण्यात घुसून तेथे तळ ठोकला आणि तेथून साताऱ्यावर चाल केली. पुढे त्याने सुपे, पाटस आणि बारामतीपर्यंत धडक मारली आणि साताऱ्यातील छत्रपतींना धोका निर्माण केला. या काळात निजामाचा सुरतेपर्यंत मुलूख लुटून बाजीराव सोनगडमध्ये आले. त्यांनी उदाजी पवारांना घेतले.

पुणे वाचवण्यास बाजीरावने थेट निझामाची राजधानी असलेल्या औरंगाबादवर चाल केली. बाजीराव गंगापूर व वैजापूर परगण्यात घुसले. हाताशी आलेला मराठा छत्रपती सोडून निजामास औरंगाबाद वाचवणे महत्त्वाचे वाटले. तो अहमदनगरला अवजड साहित्य ठेवून कासार खिंडीकडे निघाला. बाजीरावाने औरंगाबादचा रस्ता सोडून निजामाला वाटेतच पकडण्याची व्यूहरचना आखली. औरंगाबादकडे निघालेल्या निजामाच्या सैन्यावर विद्युतवेगात हल्ले चढवत बाजीरावाने त्यास सळो की पळो करून सोडले. छापा घालून चकमकींचे लढाईत पर्यवसान होण्याआधी आपल्याला अनुकूल अशा दिशेस मार्ग काढत बाजीरावाने निजामास नाशिककडे ओढत नेले. असे करता फेब्रुवारी 25, इ.स. 1728 रोजी पालखेडजवळील निपाणी प्रदेशात निजामाचे सैन्य आणि गोदावरी नदी यांच्यामध्ये ठाण मांडून बाजीरावाने निजामाला कोंडीत पकडले.

गोदावरी नदीच्या बाजूने होळकर होतेच. निजामाची रसद लुटली, धान्य तर सोडा पाणीही मिळेना. शेवटी निजामाने फेब्रुवारी 28 रोजी मराठ्यांची फळी फोडत गोदावरीपर्यंत पोचण्याचा आपल्या सैन्यास हुकूम दिला. बाजीरावाच्या वेगवान हालचालींनी दमलेल्या सैन्याने लढण्यास नकार दिला. अखेर निजामाने इवाझ खानामार्फत बाजीरावास शरणागतीचा संदेश पाठवला व दोन्ही बाजूंनी सैन्याची नुकसान न होता मराठ्यांनी निजामाच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध संपूर्ण विजय मिळवला. या विजयाचे मूल्याकंन अनेक इतिहासकारांनी “अलौकिक गनिमी कावा’ असे केले आहे.

छत्रपती शिवराय व बाजीरावाच्या युद्धनीतीचा अभ्यास जगातल्या कानाकोपऱ्यात केला जातो. अनेक वर्षांनंतर या महान योद्ध्यांचे कालातीत व्यवस्थापन आजही उपयुक्‍त ठरते. यात प्रत्येक गोष्टीत नियोजन, संघटितपणा, योग्य सेनानीचे निर्देश, जागरूक नियंत्रण व यशप्राप्तीपर्यंत एकजूट व शौर्य टिकवले आहे. आजही तरुणांना या महापुरुषांच्या शौर्यातून प्रेरणा मिळते. बाजीरावाच्या या महान पराक्रमाबद्दल कुणी त्यांना “राऊ’ तर कुणी सर्वगुणसंपन्न म्हणून “श्रीमंत’ पदवी दिली.

मस्तानी हे बाजीरावाचे अलौकिक प्रेम आहे. 27 फेब्रुवारी 1740 रोजी नासिरजंग विरुद्ध लढाई जिंकून मुंगीपैठण येथे तहात मिळविलेल्या हंडिया व खरगोणची व्यवस्था लावण्यासाठी 30 मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराच्या तापाने 28 एप्रिल 1740 (वैशाख शुद्ध शके 1662) रोजी पहाटे थोरले बाजीरावांची अखेर झाली. बाजीरावांमुळे मराठा साम्राज्याच्या कक्षा अधिक रुंदावत गेल्या. सन 1818 पर्यंत अखंड हिंदुस्थान ना मोगलांना मिळू शकला ना ब्रिटिशांना.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.