नवी दिल्ली – भारताच्या पुरुष व महिला संघाला आगामी काळात होत असलेल्या थॉमस आणि उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेसाठी सोपा ड्रॉ मिळाला असल्याचे वाटत असले तरीही स्पर्धा मात्र बलाढ्य देशांच्या खेळाडूंशी आहे, असे मत भारतीय बॅडमिंटन संघटनेने व्यक्त केले आहे.
भारताच्या पुरुष आणि महिला बॅडमिंटन संघांना येत्या ऑक्टोबरमध्ये थॉमस आणि उबेर चषक स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा सोपा ड्रॉ मिळाला असल्याचे सांगितले जात आहे. ही स्पर्धा डेन्मार्कमध्ये येत्या 3 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.
भारताच्या पुरुष संघाला क गटात स्थान देण्यात आले आहे. या गटात यजमान डेन्मार्क, जर्मनी व अल्जेरिया यांचा समावेश आहे. भारताच्या महिला संघाचा समावेश क गटात चीन, फ्रान्स व जर्मनी यांच्यासह करण्यात आला आहे. भारताच्या पुरुष आणि महिला संघाला स्पर्धेत पाचवे मानांकन देण्यात आले आहे. ही स्पर्धा मूळ वेळापत्रकानुसार गेल्या 16 ते 24 मेदरम्यान होणार होती. मात्र, करोनामुळे ती लांबणीवर टाकण्यात
आली होती.
थॉमस चषक (पुरुष) – गट अ – इंडोनेशिया, मलेशिया, हॉलंड, इंग्लंड; गट ब – चीन, तैवान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स; गट क – भारत, डेन्मार्क, जर्मनी, अल्जेरिया; गट ड – जपान, दक्षिण कोरिया, थायलंड, कॅनडा.
उबेर चषक (महिला) – गट अ – जपान, तैवान, इजिप्त, स्पेन ; गट ब – कोरिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, मलेशिया; गट क – थायलंड, डेन्मार्क, स्कॉटलंड, कॅनडा; गट ड – भारत, चीन, फ्रान्स, जर्मनी.