बॅंकॉक – थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने मलेशिया संघाचा 3-2 असे पराभव करत ब्रॉंझपदकाची निश्चिती केली. या स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. तब्बल 43 वर्षांनी भारतीय संघाने या स्पर्धेत या फेरीत प्रवेश घेत इतिहास रचला आहे.
पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात लक्ष्य सेनला ली झी जिआकडून 21-23, 9-21 असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर दुहेरीत सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने गोह स्झे फेइ आणि नूर इजुद्दीन जोडीवर 21-19, 21-15 असा पराभव केला व 1-1 अशी बरोबरी साधली.
एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारताच्या किदम्बी श्रीकांतने एनजी त्जे योंगवर 21-11, 21-17 अशी मात केली. दुहेरीच्या दुसऱ्या सामन्यात कृष्ण प्रसाद गर्ग व विष्णूवर्धन गौड पंजाला जोडीला आरोन चिआ आणि तेओ इ यी जोडीकडून 19-21, 17-21 असा पराभव पत्करावा लागला.
आता या लढतीत 2-2 अशी बरोबरी झाली. अखेरच्या सामन्यात एचएस प्रणॉयने लेओंग जुन हाओला 21-13, 21-8 असे पराभूत करत भारताला विजय मिळवून दिला.