यंदाचा पाऊस दिवाळी करूनच जाणार….

दिवाळीच्या शेवटापर्यंत मुंबईत राहणार पाऊस – हवामान विभाग

मुंबई : देशभर यंदा पावसाने चांगलाच तांडव केला. चार महिने उलटून गेले तरी पावसाचे काही भागात बरसणे सुरूच आहे. परंतू, अखेर बुधवारी पावसाने आपल्या परतीच्या प्रवासाला सुरूवात केली आहे. राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या काही भागातून पावसाने माघार घेण्यास सुरूवात केली आहे. सर्वसाधारणपणे 1 सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरूवात होते आणि 1 ऑक्‍टोबररोजी परतीचा पाऊस संपतो. परंतू, यंदा परतीच्या पावसाची उशिरा सुरूवात झाली आहे. त्यामुळे 9 नोव्हेंबरपर्यंत हा परतीचा पाऊस माघार घेणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे आणखी एक महिना देशभर पावसाचा खेळ सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

परतीच्या पावसाचा काळ हा 1 महिना असतो. त्यामुळे यंदा सुरू झालेला पाऊस 1 महिना जास्त बरसणार आहे. 9 ऑक्‍टोबर रोजी परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे 9 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा देशात मुक्‍काम असणार आहे. दरम्यान, परतीच्या पावसासाठी सध्याचे वातावरण अनुकूल असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यात पावसाने देशाला चांगलेच झोडपून काढले आहे. या चार महिन्यात देशात तब्बल 110 टक्‍के पावसाची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रात 32 टक्‍के जास्त पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मान्सूनचा हंगाम संपल्यानंतरही देशासह राज्यभरात पावसाचे तांडव सुरूच आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.