नवरात्रोत्सव साधेपणाने : मंदिर आवारात येण्यास भाविकांना मनाई
पुणे – करोना पार्श्वभूमीवर चतु:शृंगी मंदिरातील नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. यंदा मंदिराच्या आवारात भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार नसून, ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
करोना पार्श्वभूमीवर सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने 17 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत साजरा होणारा नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करणार आहे. कर्मचारी आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत मंदिरातील धार्मिक विधी होणार आहे. त्यांची मेडिक्लेम, करोना कव्हर आणि अपघाती विमा उतरविला असल्याची माहिती देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष किरण अनगळ आणि कार्यकारी विश्वस्त देवेंद्र अनगळ यांनी दिली.
शनिवारी सकाळी 9 वाजता देवीचा अभिषेक, षोडशोपचार पद्धतीने महापूजा आणि महावस्त्र अर्पण करून मंदिरात घटस्थापना होणार असून, रविवारी (25 ऑक्टोबर) दुपारी देवस्थानचे कर्मचारी आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत मंदिर परिसरात सीमोल्लंघन करण्यात येणार आहे. देवीचे दर्शन आणि सर्व धार्मिक सोहळ्यांचे थेट प्रक्षेपण संकेतस्थळ, फेसबुक आणि यू-ट्युबवर होणार आहे.
पूर्वतयारी सुरू
मंदिर आणि परिसरातील स्वच्छता, रंगरंगोटीची कामे पूर्ण झाली असून, मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. यावर्षी पूजेसाठी अकरा किलो चांदीची उपकरणे घडविण्यात आली आहेत. मंदिराच्या आवारात सुरक्षा व्यवस्थादेखील तैनात करण्यात येणार आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर थेट दर्शनासाठी एलईडी स्क्रीन लावण्यात येणार असून, भाविकांना देणगी देण्यासाठी विशेष ऍपद्वारे डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.