अनेक किश्‍श्‍यांमुळे यंदाची निवडणूक चर्चेत

“चंपा’ अन्‌ सभेसाठी मैदानांची कृत्रिम टंचाई ठरले चर्चेचे विषय

पुणे – प्रत्येक निवडणूक मग ती स्थानिक स्वराज्य संस्थेची असो, लोकसभा किंवा विधानसभेची ती कायम स्मरणात रहाते त्यामध्ये घडलेल्या विविध किश्‍श्‍यांमुळे. सोमवारी राज्यातील विधानसभेच्या 288 जागांकरिता मतदान पार पडले. पुणे शहर व जिल्ह्यातील प्रचारादरम्यान घडलेल्या विविध किश्‍श्‍यांमुळे ही निवडणूक संस्मरणीय ठरली.

विधासभा निवडणुकीचे बिगुल वाजताच थेट शरद पवार यांना इडीची नोटीस, अजित पवार यांचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा, पत्रकार परिषदेत फुटलेला अश्रुंचा बांध यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. मात्र, त्यानंतर इडीने माघार घेत, शरद पवारांनी चौकशीला येण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करताच राजकीय वातावरण काहीसे निवळले. त्यानंतर आपल्या रोखठोक वक्‍तव्यासाठी प्रसिद्ध असलेले मराठा हेवीवेट नेते अजित पवार यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली.

पिंपरीतील पत्रकार परिषदेत त्यांनी चंद्रकांत पाटलांचा “चंपा’ असा केलेला उल्लेख चांगलाच चर्चेत आला. तर या निवडणुकीत मनसेच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले. मात्र, मध्यवस्तीतील शाळा, महाविद्यालयांची मैदाने उपलब्ध करून न दिल्याने मनसेने रस्त्यावर सभा घेण्याची परवानगी मागितली होती.

मात्र, ती नाकारल्याने शेवटी मंडईत ठाकरे यांनी प्रचारसभा घेतली. मात्र, भाजप उमेदवारांच्या प्रचाराकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी स.प. महाविद्यालयाचे मैदान उपलब्ध करून दिल्याने, अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभांकरिता निर्माण करण्यात आलेली मैदानांच्या कृत्रिम टंचाईचीच चर्चा नागरिकांमध्ये होती.

टीकेला पाटील यांच्याकडून थंड डोक्‍यानी उत्तरे
भाजपचे वजनदार नेते चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडमधून निवडणूक लढण्याच्या निर्णयामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदार संघावर केंद्रीत झाले होते. मात्र, आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी कोल्हापुरच्या पुरात वाहुन आलेले उमेदवार असा चंद्रकांत पाटलांचा उल्लेख केला. चंपा आणि पुरात वाहुन आलेला उमेदवार या टीकेवर पलटवार करताना पाटलांनी थंड डोक्‍याने उत्तरे दिली. याशिवाय पुण्यातील वाहतूक कोंडीमुळे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंना पंतप्रधान मोदींच्या सभेला न लावता आलेली हजेरी, सिने अभिनेत्यांचा रोड शो, मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत पडणारा मुसळधार पाऊस, कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचाराकरिता वरिष्ठ नेत्यांनी फिरविलेली पाठ अशा अनेक किश्‍श्‍यांमुळे ही निवडणूक संस्मरणीय ठरली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)