यंदाची निवडणूक भाजप विरुद्ध वंचित बहुजन आघाडी – प्रकाश आंबेडकर

पुणे – “देशातली जनता घराणेशाही, कुटुंबशाही, परिवारवादाला कंटाळली आहे. यातच अडकलेल्या लोकशाहीला खऱ्या अर्थाने मुक्त करण्याची गरज आहे. त्यामुळे लोकसभेची खरी लढाई ही भाजपविरूद्ध वंचित बहुजन आघाडी अशीच होणार आहे. कॉंग्रेस ही तिसऱ्या क्रमांकावर राहील,’ असे मत वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे व्यक्त केले.

वंचित बहुजन आघाडीचे पुण्यातील उमेदवार अनिल जाधव यांच्या प्रचारासाठी एसएसपीएमएसच्या मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. “राजकारणात सर्वत्र घराणेशाही आहे, मक्तेदारी आहे. ती मोडून काढण्यासाठीच वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. त्याच्या भीतीमुळेच शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली. पण नातवाला मावळातून उमेदवारी दिली,’ अशी टीका आंबेडकर यांनी केली. “आम्ही पहिल्यांदाच वंचित घटकांना उमेदवारी दिली. इतकेच काय, त्यांची जातही जाहीर केली. म्हणूनच आम्हाला मोठा पाठिंबा मिळत आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना अशा सर्वच पक्षात घराणेशाही व अन्य कारणांमुळे अनेक जण “वंचित’ राहिले आहेत. त्या सर्वांचाच आम्हाला “आतून’ पाठिंबा आहे,’ असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देशात अराजक माजवले आहे. एकीकडे देशप्रेमाचा आव आणणारे मोदी दुसरीकडे देशाची संपत्ती कवडीमोल भावात उद्योगपतींना विकत आहेत. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी मला भेटायला बोलावले होते. मी गेलो नाही. मात्र, 23 मे नंतर मोदी सरकारचा पराभव झाल्यानंतर मी त्यांना नक्की भेटेन, असेही ते म्हणाले.

“ते पैसे जनतेत वाटा’
रविवारी सायंकाळी प्रचार संपला, की दोन्ही प्रमुख पक्षांचा पैशाचा-नोटांचा खेळ होईल. एकेका मतदारसंघात 50 कोटींचा खेळ होईल, अशी माझी माहिती आहे. पोलिसांनी त्याकडे लक्ष द्यावे, हा पैसा ताब्यात घ्यावा, परंतु, तो सरकार दरबारी न जमा करता, गोरगरिबांना वाटावा, असे अजब विधानही प्रकाश आंबेडकर यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.