पुणे – महाराष्ट्र राज्य स्थापनेला दि. 1 मे 2020 रोजी 60 वर्षे पूर्ण होत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 3 मे पर्यंत लॉकडाऊन लागू आहे. या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र दिन हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्याच्या मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी-पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे. इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येवू नये, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.
कवायतींचे आयोजन करण्यात येवू नये. विधिमंडळ, उच्च न्यायालय व इतर संविधानिक कार्यालयांमध्ये कमीत कमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात यावे. ध्वजारोहण करणारे पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास, जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहण करावे, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.