गेल्या वर्षी 60 हजार तर, यावर्षी दीड लाखाचे लक्ष्य
गतवर्षी झाली होती दमछाक; यंदा लक्ष्य वेळेत पूर्ण होणार का?
पिंपरी – दिवसेंदिवस बिघडत चाललेला पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी राज्य सरकार तथा पिंपरी-चिंचवड महापालिका शहरात जास्तीत-जास्त वृक्ष लागवड करण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी गतवर्षी केलेलया वृक्षारोपणाच्या तुलनेत यंदा सुमारे तिप्पट म्हणजे दिड लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाकडून ठेवण्यात आले आहे. गेल्यावर्षी 60 हजार रोपांची लागवड करताना उद्यान विभागाला नाकी नऊ आले होते, त्यामुळे यंदाचे अवाढव्य लक्ष्य उद्यान विभाग वेळेत पूर्ण करणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या वर्षी राज्य सरकारकडून संपूर्ण राज्यात 13 कोटी रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेने सहभाग घेत 60 हजार वृक्ष लागवड शहरात करण्याचे ठरवले होते. मात्र, ते उद्दिष्ट मुदतीपुर्वी गाठण्यात उद्यान विभागाला अपयश आले होते. मात्र, आता दीड लाख वृक्षरोपणाचे उद्दिष्ट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गतवर्षी उद्यान विभागाकडून लष्कराच्या जागेवर 35 हजार, देहूरोड येथे 30 हजार, मेट्रोने 5 हजार तर, शहरात प्रभागनिहाय विविध ठिकाणी 45 हजार वृक्ष लागवड करण्यात आली असल्याचे उद्यान विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, यापैकी किती झाडे वाचली किंवा जगली याचे निश्चित उत्तर उद्यान विभागाकडे नाही. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लष्कराच्या जागेतच लक्ष्यपूर्ती होणार आहे. 1 लाख वृक्षलागवड लष्कराच्या हद्दीत औंध येथील जागेत, 35 हजार तळेगाव येथील मिलिटरी हेडक्वॉर्टर येथील जागेत, तर दिघी येथील मॅगझिनजवळील संरक्षण विभागाच्या 50 एकर जागेत 35 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.