2014 पेक्षाही महाराष्ट्रात यंदा मोठी ‘मोदी लाट’ : मुख्यमंत्री

इतर पक्षांचे बडे नेते भाजपात येण्याचे संकेत

मुंबई – 2014 मध्ये लोकसभा निवडणूकीत संपूर्ण देशभरात मोदी लाट होती. त्यापेक्षाही यंदा मोठी ‘मोदी लाट’ निर्माण झाली असून राज्यात भाजपा-शिवसेना महायुती रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच देशाची प्रगती होत आहे हा विश्वास असल्याने इतर पक्षातील प्रमुख नेते भाजपात येण्यास उत्सुक असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात लोकसभा निवडणुकीसाठी उभारण्यात आलेल्या “मिडिया सेंटर’चे उदघाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, प्रवक्ते केशव उपाध्ये, माधव भांडारी आदी उपस्थित होते.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती त्यापेक्षा मोठी लाट या निवडणुकीत आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्याची लोकांची मानसिकता बनली आहे, असे सांगतानाच देशात लोकसभा निवडणुकीत पहिला क्रमांक भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीएचाच असेल हे आता विरोधी पक्षांनीही मान्य केले असून त्यांच्यामध्ये दुसछया क्रमांकासाठी स्पर्धा सुरू आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पवार ‘मॅच्युअर्ड’, पण त्यांचे नेते ‘इमॅच्युअर्ड’
शरद पवार यांनी एअरस्ट्राईकवरून केलेल्या वक्तव्यावर सध्या वाद निर्माण झाला आहे. त्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, शरद पवार यांनी पहिले काय वक्तव्य केले ते मी ऐकले नाही. मात्र नंतर त्यांनीच स्वतः आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. पण त्यांच्याकडे सध्या असंमजसपणाची स्थिती आहे. एअरस्ट्राईकचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळू नये यासाठी कदाचित असे होत असावे. पण शरद पवार हे ‘मॅच्युअर्ड’ नेते आहेत. पण त्यांच्या पक्षात अनेक ‘इमॅच्युअर्ड’ नेते आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.

आठवलेंना लोकसभेचे तिकिट नाही
यंदाच्या लोकसभा निवडणूकीत रामदास आठवले यांच्या रिपाइंला पक्षाला उमेदवारी देणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र, विधानसभा निवडणूकीत त्यांच्या पक्षाचा योग्य मान राखला जाईल, असे स्पष्ट करतानाच यासंदर्भात आठवलेंशी आपली चर्चा झाली असल्याचे ते म्हणाले. 24 मार्च रोजी युतीची सभा होणार असून या सभेमध्ये ते उपस्थित राहणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.