मुंबई: करोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यानुसार मुंबईतील प्रख्यात लालबागचा राजा या गणेश मंडळाने यंदाचा आपला उत्सव रद्द केला आहे.
यंदा लालबागच्या राजाची गणेशमूर्ती मंडपात नेहमीप्रमाणे विराजमान केली जाणार नाही. या मंडळाचे सेक्रटरी सुधीर साळवी यांनी ही माहिती वार्ताहरांना दिली.
यंदा मंडळातर्फे रक्तदान, प्लाझ्मा दान असे उपक्रम सुरू केले जाणार असून करोना विरुद्धच्या लढाईत ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे, अशी माहिती साळवी यांनी दिली.
मुख्यमंत्री सहायता निधीत 25 लाख रुपयांची देणगी देण्याचा निर्णयही मंडळाने घेतला आहे. चीनशी झालेल्या संघर्षात प्राण गमावलेल्या 20 शहीद जवानांच्या कुटुंबीयांचाही मंडळातर्फे यावेळी सत्कार केला जाणार आहे.