यंदा सोलापूर जिल्ह्याची आघाडी : निकाल 4.62 टक्क्यांनी वाढला
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत पुणे विभागाचा निकाल 92.50 टक्के इतका लागला आहे. अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे विभागात पुण्याचा 92.24 टक्के, तर अहमदनगरचा 91.97 टक्के आणि सोलापूर जिल्ह्याचा 93.74 टक्के इतका निकाला आहे. यंदा विभागात सोलापूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. यावर्षी पुणे विभागाचा निकाल 4.62 टक्क्यांनी वाढला आहे.
पुणे विभागातून बारावी परीक्षेला 2 लाख 40 हजार 617 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 2 लाख 22 हजार 646 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णाची टक्केवारी 92.50 इतकी आहे. तसेच यंदा बारावी परीक्षेला पुनर्परीक्षार्थींची संख्या 13 हजार 259 इतकी होती. त्यापैकी 4 हजार 519 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णाची टक्केवारी 34.08 आहे. या निकालाची माहिती विभागाचे विभागीय अध्यक्ष टी. एन. सुपे आणि सचिव प्रिया शिंदे यांनी दिली. गतवर्षी विभागाचा निकाल 87.88 टक्के इतकी होती. तसेच विभागात मुलांचे उत्तीर्णाचे प्रमाण 93.64 टक्के, तर मुलींचे हेच प्रमाण 98.67 टक्के इतकी आहे. यावर्षी मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 5 टक्क्यांनी जास्त आहे.
पुणे जिल्ह्यातून बारावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 23 हजार 655 इतकी आहे. त्यापैकी 1 लाख 14 हजार 56 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णाची टक्केवारी 92.24 आहे. अहमदनगर जिल्ह्यातून 63 हजार 513 विद्यार्थी परीक्षा दिली. त्यापैकी 58 हजार 412 विद्यार्थी उत्तीर्ण असून, त्यांची टक्केवारी 91.97 आहे. सोलापूर जिल्ह्यातून 53 हजार 529 विद्यार्थी बारावी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 50 हजार 178 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याची टक्केवारी 93.74 आहे. तसेच 319 विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवल्याचे पुणे विभागीय बोर्डाने सांगितले आहे.
शून्य टक्के आणि शंभर टक्के निकाल
पुणे विभागातील एका महाविद्यालयाचा विज्ञान शाखेतील निकाल शून्य टक्के लागला, तर 539 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला. कला शाखेतील 115, वाणिज्य शाखेतील 198, व्यवसाय अभ्यासक्रमाच्या 16 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला.