नगर – देशाच्या जनगणनेसाठी मोठया प्रमाणात शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येणार असून त्यासाठी त्यांच्या मे महिन्यातील सुट्ट्याही रद्द केल्या जाणार आहेत. जनगणना अधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना तशा नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे राज्यातील लाखो शिक्षकांमध्ये आक्रोश निर्माण झाला असून विविध शिक्षक संघटनांनी या निर्णयाचा निषेध करत शिक्षकांच्याच माथी हे काम मारू नये अशी मागणी केली आहे. 2021 च्या जनगणनेचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये घरांना क्रमांक देणे, गटाची विभागणी करणे, घरयादी तयार करणे आदी कामे 1 मे ते 15 जून 2020 या कालावधीत केली जाणार आहेत. त्यासाठी या कालावधीतील शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे वर्षाच्या 76 पैकी 39 सुट्ट्यांवर गदा येणार आहे.